जळगाव । प्रतिनिधी jalgaon
आसोदा आणि परिसरात शिवसेनेचे लोकप्रिय नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारसभेने विकासाचा जयघोष केला. रस्ते पुल, गावांतर्गत सर्वांगीण विकास, शेत रस्ते, सिंचन बंधारे, ज्येष्ठ नागरिक सभागृह आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारक अशा विकासकामांची यशस्वी पूर्तता झाल्याने आसोदा व परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
आसोदेकरांनी कधीही जाती-पातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्याचा आदर्श कायम ठेवला असल्याचे प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना सांगितले. ‘वासुदेव आला रे, वासुदेव आला! गुलाबभाऊंच्या साथीनं धनुष्यबाण आला’! या वासुदेवांच्या खास गीतांनी संपूर्ण असोदा परिसर दुमदुमून गेला. प्रचार रॅलीत माजी महापौर ललित कोल्हे, जनाआप्पा कोळी, बापू महाजन, विनायक ढाके, गिरीश भोळे, तुषार महाजन, महेश भोळे, जीवन सोनवणे, सूर्यकांत चौधरी, अजय महाजन, सुभाष माळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
वायफळ बडबड करणार्या पेक्षा जनता काम करणार्याला साथ देईल-गुलाबराव पाटील
- मी प्रामाणिकपणे विकासकामे केली आहेत, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील रस्ते, बंधारे व गिरणा नदीवरील पूलाचे प्रकल्प मार्गी लावले, पिंप्री सारख्या गावात प्रचंड प्रमाणावर निधी उपलब्ध करून रस्त्यांसोबत बंधार्याच्या जाळे विणले. मतदारसंघ शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून प्रत्येक सामाम्य व गोर गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मतदार संघात सदैव संपर्कात राहून राहिल्यामुळे सामान्य जनतेशी नाळ अधिक घट्ट केली आहे.
विकासासाठी कधीही मतदारांशी दुजाभाव केला नाही. वायफळ बडबड करणार्या पेक्षा जनता काम करणार्याला साथ देईल असा ठाम विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. आम्ही पिंप्री-सोनावद जि.प.गटातून जास्तीत जास्त लीड देणार असल्याचे भाजपाचे जि.प.चे माजी सभापती पी.सी.आबा पाटील व जि.प.सदस्य गोपाल बापू चौधरी यांनी सांगितले, पिंप्री येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.