जायखेडा | वार्ताहर Jaykheda
बागलाण तालुयातील खमताणे येथील स्मशानभुमीत अंधश्रध्देतून अघोरी पुजेचा धक्कादायक आणि रहस्यमय प्रकार उघडकीस आला आहे. पाच महिला व दोन पुरूषांचे नागफणीचे खिळे टोचलेले फोटो, काळे कापड, केस, बाहुल्या तसेच अघोरी पुजाविधीसाठी लागणारे साहित्य दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, स्मशानभुमीत रात्रीच्या सुमारास ही अघोरी पुजाविधी पार पडला असावा असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला असून सापडलेल्या फोटोंवर महिला व पुरूषांची नावे देखील आहेत. त्यामुळे पोलिसांनी या घटनेची गंभीरतेने दखल घेत सखोल चौकशी करत कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या घटनेचे समजलेले वृत्त असे की, खमताणे येथील स्मशानभुमीत आज सकाळी गेलेल्या ग्रामस्थांना सात व्यक्तींचे फोटो, मडके, काळे कापड, काळे धागे, त्यात गुंडाळलेले कपडे, केस तसेच पूजाविधीसाठी वापरण्यात आल्याचे दिसणारे साहित्य आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या सात फोटोंमध्ये पाच महिलांचे आणि दोन पुरुषांचे फोटो आढळून आले फोटोंना नागफणीचे खिळे देखील टोचलेले दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले.
महिला व पुरूषांच्या फोटोंसमोर काही पूजाविधी केल्याच्या खुणाही दिसून आल्या. यामुळे ज्यांचे फोटो आहेत त्यांनी अंधश्रध्देतून पुजाविधी केला आहे की त्यांच्या फोटोचा दुरूपयोग करत अज्ञातांनी अघोरी पुजाविधी केला याबद्दल तसेच संबंधित व्यक्तींचे फोटो येथे ठेवण्यामागचा उद्देश काय? असे अनेक ग्रामस्थांनी उपस्थित केले आहे. स्मशानभुमीत अघोरी पुजाविधी किंवा अंधश्रध्देतूनच असे कृत्य घडत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या रहस्यमय प्रकारामागील सत्य समोर आणण्यासाठी पोलिसांनी घटनेची चौकशी करून फोटो व साहित्य कोणी ठेवले, याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. यामुळे सात फोटों स्मशानभुमीत ठेवणे व अघोरी पुजाविधी करण्यामागचे रहस्य काय आहे, याकडे खमताणे पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.




