Tuesday, May 21, 2024
Homeनगरनियम डावलून जाहिरात फलकांना महापालिकेकडून परवानगी

नियम डावलून जाहिरात फलकांना महापालिकेकडून परवानगी

भविष्यात मुंबई सारखी घटना घडल्यावरच मनपाला जाग येणार का?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर शहरातील प्रमुख रस्त्यालगत, खासगी इमारतींवर उभारण्यात आलेल्या अवघ्या 384 जाहिरात फलकांची नोंद नगरच्या महापालिकेकडे उपलब्ध आहे. जाहिरात फलकांबाबत राज्य शासनाने 2022 मध्ये जारी केलेले नियम डावलून प्रमुख चौकात व रस्त्यालगत मोठ्या जाहिरात फलकांना महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. फलकांमुळे होणारे विद्रुपीकरण टाळण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहितीही मनपाच्या संबंधित अधिकार्‍याकडे नसल्याचे समोर आले आहे.

मुंबई येथे वादळामुळे मोठा जाहिरात फलक पडून अनेकांचे बळी गेले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडे अनधिकृत फलकांबाबत माहिती घेतली असता, अशी कोणतीही माहिती मनपाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनाने जमिनीवरील व इमारतींवरील जाहिरात फलकांच्या उभारणीबाबत नियमावली दोन वर्षांपूर्वीच निश्चित केलेली आहे. यात अनेक ठिकाणी जाहिरात फलकांना परवानगी देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांलगत मनपाने अनेक जाहिरात फलकांना परवानगी देताना हे नियम डावलण्यात आल्याचे चित्र आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फलक उभारले जात असताना त्यावर मनपाकडून कोणतीही कारवाई झाल्याची नोंद नाही. त्यामुळे भविष्यात मुंबई सारखी घटना घडल्यावरच मनपाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नगर परिषद आणि नगर पंचायत भागात देखील वेगळी परिस्थिती नसून मुंबईच्या घटनेनंतर ग्रामीण भागात असणार्‍या मोठ्या जाहिरात फलकांचा विषय ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात देखील जाहिरात फलकाबाबत सरकारच्या धोरणानुसार कार्यवाही होण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या