मुंबई । Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) राजकीय मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या कथित द्वेषपूर्ण भाषणांमुळे उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल झाली आहे.
उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी ॲड. श्रीराम परक्कट यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये राज ठाकरे व मनसे कार्यकर्त्यांविरोधात हिंदी भाषिकांवर लक्षित हल्ले, धमक्या आणि द्वेष पसरवणारे भाषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांत त्यांना त्यांच्या उत्तर भारतीय हक्कांच्या वकिलीमुळे महाराष्ट्रात सातत्याने धमक्या, छळ आणि शारीरिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. या घटनांनी आता सार्वजनिक हिंसाचाराचा स्वरूप घेतल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या याचिकेत मनसेविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसेच निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.