Saturday, July 27, 2024
Homeनगरकबुतर चोरीच्या संशयावरून मुलांना अमानुष मारहाण

कबुतर चोरीच्या संशयावरून मुलांना अमानुष मारहाण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शेळी व कबुतर चोरी केल्याच्या संशयावरुन 4 मुलांना शेतात नेवून झाडाला उलटे टांगत 6 जणांनी अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची धक्कादायक व अमानुष घटना तालुक्यातील हरेगाव येथे घडली. या घटनेच्या निषेधार्थ काल हरेगाव बंद होते. या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. लहू कानडे यांनी साखर कामगार रुग्णालयात जावून जखमींची भेट घेवून विचारपुस केली.

- Advertisement -

हरेगाव-उंदिरगाव येथे शुक्रवारी सकाळी युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे या सहा जणांनी शेळी व कबुतरे चोरल्याच्या संशयावरून गावातील शुभम माघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड, प्रणय खंडागळे यांना गलांडे यांच्या शेतातील विहिरीवर नेले. तेथे त्यांना अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ शुक्रवारी सायंकाळी उशिरा गावातील काहींच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आल्यानंतर काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेत या मुलांची सुटका केली. याबाबत शनिवारी सकाळी गावात माहिती पसरल्यानंतर या घटनेतील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी गाव बंद ठेवण्यात आले.

माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. जखमींना येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले असून पुढील उपचार वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने व डॉ. राहुल कुलकर्णी करीत आहेत.

दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच व घटनेची माहिती मिळताच मोठा जमाव साखर कामगार रुग्णालयाच्या आवारात जमा झाला होता. त्यानंतर रुग्णालयासमोर नेवासा रोडवर रास्तारोको करण्याचाही प्रयत्न झाला.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी, सहायक निरीक्षक जीवन बोरसे, निकम आदींनी जमावाला शांत केले.

याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे. लवकरच आरोपी अटकेत असतील असे आश्वासन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले.

सायंकाळी रिपाई नेते सुरेंद्र थोरात, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, नितीन दिनकर, अरुण पाटील नाईक, सुभाष त्रिभुवन, शरद नवले, प्रकाश चित्ते, अभिषेक खंडागळे, मारुती बिंगले, संजय छल्लारे, बबन मुठे, मिलिंद साळवे, संदीप मगर आदींनी साखर कामगार रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

मानवतेला काळीमा फासणारी घटना – ना. विखे

हरेगाव येथील घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनास दिल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी दहशतीमुळे हा अन्याय सहन केला. दहशतीखाली लोक वावरत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. आपण स्वत: लक्ष घालून हरेगाव येथे ग्रामसभा घेणार आहोत. येथील दहशत पूर्णपणे मोडून काढण्याबाबत पोलीस प्रशासनास सूचना दिल्या आहेत. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी रास्तारोको मागे घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले.

गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी – आ. कानडे

हरेगाव येथील घटना अमानुष असून ती समाजाला काळीमा फासणारी आहे. मुळात एवढे धाडस कसे होते. यांना सरकारची भीती वाटते की नाही? पोलीस विभाग काय करतो? हे सरकारचे अपयश असल्याचा आरोप आ. लहू कानडे यांनी केला. ज्यांनी मुलांना मारहाण केली त्या कुटुंबाविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यातील किती प्रकरणांची चौकशी करण्यात आली व आरोपपत्र दाखल करण्यात आले हे पहावे लागेल. या लोकांनी घरासमोर हरणे पाळल्याचे दिसत आहेत. त्यांच्याविरुद्ध वन्य प्राणी कायद्याअंतर्गत आजामीनपात्र गुन्हा दाखल करायला हवा होता. पुढील आठवड्यात याठिकाणी मतमाऊलीची यात्रा भरत आहे. त्यामुळे हरेगाव शांत होण्याची आवश्यकता आहे. घटनेतील सर्व गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे, असे आ. कानडे म्हणाले.

विविध संघटनांचा आज रास्तारोको

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील हरेगाव येथे अल्पवयीन मुलांना झाडाला उलटे टांगून झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करावी तसेच आरोपींविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, या मागणीसाठी रविवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता हरेगाव फाटा येथे रिपाई, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, भिमशक्ती आदी पक्षसंघटना रास्तारोको आंदोलन करणार आहेत.

रास्तारोको आंदोलनाच्या या इशारापत्रावर बेलापूरचे सरपंच रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विभागीय प्रमुख भिमराज बागुल, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पटारे, रिपाइं जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, महेंद्र साळवी, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, भाजप विधानसभा प्रमुख नितीन दिनकर, हरेगाव सरपंच दिलीप त्रिभूवन, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख सचिन बडधे, शिवसेना संघटक निखिल पवार, नाना खरात, रमेश भालेराव, सुनिल शिंगारे, आकाश सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष राजू मगर, संजय बोरगे, युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर, सोनू राठोड, दत्ता जाधव, मोहन आव्हाड, बंडू शिंदे, रुपेश हरकल, अ‍ॅड. प्रविण लिप्टे, गिरीधर आसने, डॉ. शंकर मुठे, भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, अमोल शिंदे, चरण त्रिभूवन, सुनिल शिरसाठ आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या