Monday, October 14, 2024
Homeनगरमोकाट कुत्र्यांनंतर डुकरांचा धुमाकूळ; दोघांना चावा

मोकाट कुत्र्यांनंतर डुकरांचा धुमाकूळ; दोघांना चावा

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील नागरिक अगोदरच मोकाट कुत्रे आणि जनावरांपासून हैराण झालेले असताना आता डुकरांच्या हल्ल्याने भयभीत झाले आहेत. पिसाळलेल्या डुकरांच्या हल्ल्यात पेमराज सारडा महाविद्यालयाचे दोन कर्मचाऱी गंभीर जखमी झाले आहेत.

महाविद्यालयाच्या आवारात पिसाळलेल्या डुकराने धुमाकूळ घालत महाविद्यालयाच्या दोघा कर्मचार्‍यांना चावा घेतला. यामध्ये वसंत शिंदे आणि दशरथ बत्तीन हे दोन कर्मचारी जबर जखमी झाले आहेत. त्यामुळे मोकाट कुत्र्यांनतर शहरात आता डुकरांची दहशत निर्माण झाली असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
पेमराज सारडा महाविद्यालयातील वसंत शिंदे, दशरथ बत्तीन नियमित कामे करत होती.

- Advertisement -

डुकराने महाविद्यालयाच्या आवारात धुमाकूळ घातल्याने प्राध्यपाकांसह विद्यार्थ्यांमध्ये एकच पळापळ झाली. सर्वांमध्ये भीतीचे वातावरण होतेे. गुरुवारी (दि. 19) दुपारी अडीचच्या सुमारास सैरावरा पळत सुटलेले पिसाळलेले डुक्कर अचानक महाविद्यालयाच्या आवारात घुसले. आवारात गोंधळ घातल्यानंतर हे डुक्कर पर्यवेक्षकाच्या दालनात शिरले. तेथील काचेला धडका दिल्या. एकूण प्रकार पाहता दालनात बसलेले कर्मचारी आणि प्राध्यापकांची धावपळ उडाली. काय करावे, हे त्यांना समजेना. हाकलण्याचा प्रयत्न केल्यास डुक्कर अंगावर धावून येत होते.

शिंदे व बत्तीन यावेळी तेथे पोचले. डुकराला हाकलण्याचा प्रयत्न केला असता ते त्यांच्या अंगावर धाऊन गेले. त्याना चावा घेतला. एकाच्या हातावर तर एकाच्या मांडीला चावा घेतला. कर्मचारी रक्तबंबाळ झाल्यानंतर आणखी घबराट पसरली. कसेबसे डुक्कर बाहेर गेल्यानंतर जखमी कर्मचार्‍यांना लगेच जवळच असलेल्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथेही उपचारासाठी आवश्यक असलेल्या लशीची कमतरता असल्याचे सांगण्यात येत होते. एकीकडे डुकराच्या हल्ल्याने विद्यार्थी आणि प्राध्यापक व कर्मचारी घाबरलेले असतानाच लस कमी असल्याच्या चर्चेने त्यांच्या संतापात भर पडली.

शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. रात्रीच्या वेळी कुत्रे वाहनचालक व पादचार्‍यांवर थेट हल्ला करतात. यात एकाचा मृत्यू झाल्याची घटनाही शहरात घडलेली आहे. वारंवार मागणी करूनही कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाही. दुसरीकडे शहरात रस्त्यांवर व चौकाचौकात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. वाहतुकी अडथळा ठरणारी ही जनावरे अनेकदा अपघातासाठीही निमंत्रण ठरत आहे.

महापालिका केवळ जनावर मालकांना इशारे देऊन गप्प बसत आहे. जनावर आणि त्यांच्या मालकांवर कठोर कारवाईचे पाऊल अद्याप उचलण्यात आलेले नाही. या दोन प्राण्यांपासून आपला जीव कसा वाचवावा, या चिंतेत असलेल्या नगरकरांना आता डुकरांच्या हल्ल्याच्या घटनेने आणखी भयभीत केले आहे. महापालिकेने संबंधितांवर ताततडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या