अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्य सरकारच्यावतीने राबवण्यात येणार्या एक रुपयात पीक विमा योजनेची यंदाची विमा भरण्याची मुदत सोमवार (दि.15) रोजी रात्री 12 वाजता संपणार होती. दरम्यान, अधिकाअधिक शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळावा, त्यांचा सहभाग या विमा योजनेत व्हावा, यासाठी मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील पिक विमा योजनेला केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडून 15 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यानूसार शेतकर्यांना आता 31 जुलैपर्यंत पिक विमा काढता येणार आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील 4 लाख 29 हजार 839 शेतकर्यांनी यंदा या योजनेत सहभाग नोंदवला असून त्यांनी पीक विम्यासाठी 9 लाख 37 हजार 380 अर्ज दाखल केलेेले आहेत. यात 14 हजार 380 कर्जदार शेतकर्यांचा तर 9 लाख 23 हजार बिगर कर्जदार शेतकर्यांचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. आता या विमा योजनेला 15 दिवसांची मुदत वाढ मिळाल्याने अधिकाअधिक शेतकर्यांना या योजनेत सहभाग घेता येणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
यंदा खरीप हंगाम 2024 या पिका विमा योजनेत 15 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत विमा भरण्यासाठी मुदत होती. मागील वर्षी या योजनेत (खरीप 2023) मध्ये जिल्ह्यातून 5 लाख 67 हजार शेतकर्यांनी 11 लाख 80 हजार पिक विम्याचे अर्ज दाखल केले होते. यातील शेतकर्यांना आतापर्यंत पीक विमा कंपनी एकूण 1 हजार 167 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. मंजूर करण्यात आलेली भरपाई ही सोयाबीन
आणि मका पिकाची असून यात नुकसान झालेल्या पिकांच्या 25 टक्के अग्रीमच्या रक्कमेचाही समावेश आहे. शेतकर्यांनी गेल्यावर्षी दहा पिकांचा विमा काढला होता. यातील दोन पिकांचा विमा संबंधीत विमा कंपनीने मंजूर केलेला असून उर्वरित आठ पिकांचा विमा येत्या 15 दिवसात मंजूर होणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. चालूवर्षी 15 जुलैपर्यंत सांयकाळपर्यंत अकोले तालुक्यातील 11 हजार 358, जामखेड 36 हजार 965, कर्जत 25 हजार 151, कोपरगाव 31 हजार 384, नगर 18 हजार 608, नेवासा 54 हजार 721, पारनेर 42 हजार 79, पाथर्डी 32 हजार 545, राहाता 29 हजार 167, राहुरी 30 हजार 270, संगमनेर 41 हजार 23, शेवगाव 33 हजार 410, श्रीगोंदा 27 हजार 958 आणि श्रीरामपूर तालुक्यातील 20 हजार 929 अशा 4 लाख 29 हजार 839 शेतकर्यांनी सहभाग घेत एक रुपयात विमा भरलेला आहे.
या योजनेत शेतकरी लाभार्थी हिश्शासह राज्य आणि केंद्र सरकार त्यांच्या वाट्याला येणार्या रक्कमेचा विमा कंपनीकडे हप्ता भरून शेतकर्यांना विमा योजनेत सहभागी करून घेत आहे. यंदा देखील शेतकर्यांचा सहभाग वाढावा, यासाठी राज्य सरकारने योजनेला मुदत वाढ मिळावी, अशी केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडे मागणी केली होती. त्यानूसार केंद्रीय कृषी संचालक, नवी दिल्ली चंद्रजीत चेटर्जी यांनी योजनेला 15 दिवसांची मुदत वाढ दिली असल्याचे पत्र राज्याचे कृषी विभागाचे मुख्य सचिव यांना सोमवारी पाठवले आहे.