Saturday, July 27, 2024
Homeनगरपिंपरी निर्मळ परिसरातील खरीप पिके गेली वाया

पिंपरी निर्मळ परिसरातील खरीप पिके गेली वाया

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्राच्या टापुत येणार्‍या पिंपरी निर्मळ परिसरातील खरीप पिके पावसाअभावी जळून गेली आहेत. आज होईल, उद्या होईल, पुढील आठवड्यात भरपूर होणार आहे अशी पावसाची भविष्यवाणी करणारे स्वयःघोषीत हवामान तज्ञ व हवामान खात्याचे अंदाज यावर्षी पावसाने सपशेल धुडकावुन लावल्याने शेतकर्‍यांचे मात्र प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न बिकट झाला आहे.

- Advertisement -

मान्सूनच्या पावसाचे चालु वर्षी खरीपात उशारा आगमन झाले. झालेला पाऊसही अत्यंत तोकडा पडला. कमी ओलीवर पेरणी केलेली खरीप पिकांचा उताराही कमी झाला आहे. गेल्या महिन्यापासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने ही पिके पाण्याअभावी जळून गेली आहे. पिंपरी निर्मळ परिसराला पाटपाण्याची सोय नसल्याने विहिरी व बोअरवेल्स कोरडे पडलेले आहेत. पावसाळ्याचे अडीच महिने संपून गेले आहेत.

शेती मशागत, पेरणी, बियाणे, खते, कीटकनाशके आदींसाठी एकरी हजारो रुपयांचा खर्च शेतकरी करून बसले आहेत. मात्र पावसाच्या मोठ्या खंडामुळे पिके ऐन फुलोर्‍याच्या टप्प्यात पूर्णतः जळाली आहेत. फुलोरा गळून गेल्यामुळे आता एवढ्यात जरी पाऊस झाला तरी या सोयाबीन पिकाला काही येणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे चालू वर्षाचा खरीप जवळपास वाया गेल्याची चिन्हे आहेत.

जून अखेर शेतकर्‍यांचे पशुधनाच्या चार्‍याचे नियोजन असते. मात्र ऑगस्ट संपत आला तरी पाऊस नसल्याने पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्नही बिकट झालेला आहे. तीन ते चार हजार रुपये प्रति टनाप्रमाणे चार्‍यासाठी ऊस विकत घेण्याची वेळ शेतकर्‍यांवर आलेली आहे. त्यामुळे पशुधन व्यवसाय संकटात सापडल्याचे चित्र निर्माण झालेली आहे. वाया गेलेला खरीप हंगाम व पशुधनाच्या चार्‍याचे संकट यामुळे चालू वर्षी शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे चित्र पिंपरी निर्मळ परिसरात दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या