Wednesday, September 11, 2024
Homeनगरनिर्मळ पिंपरीमध्ये 2 कुटुंबावर जीवघेणा हल्ला

निर्मळ पिंपरीमध्ये 2 कुटुंबावर जीवघेणा हल्ला

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावात मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात वाद झाल्याने एका गटाच्या जमावाने दोन कुटूंबावर जिवघेणा हल्ला करीत घराची तोडफोड व जाळपोळ करीत घरासमोर असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान केले. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुरुवारी 71 जणांविरोधात अ‍ॅट्रोसीटीसह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

- Advertisement -

सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला असलेल्या अस्तगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये पिंपरी निर्मळ गावातील तरुणांच्या दोन गटात वाद झाले होते. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर गाव पातळीवर या दोन गटांमध्ये पोलिसांच्या सहकार्याने वादावर पडदा टाकण्यात आला. परंतू बुधवार दि. 6 डिसेंबर रोजी रात्री या मागील भांडणाच्या कारणावरून गावातील संतप्त झालेल्या एका गटाच्या 400 ते 500 जणांच्या जमावाने दोन घरांना लक्ष करीत घरांची तोडफोड, जाळपोळ करून घरासमोर लावलेल्या वाहनांचे नुकसान केले. या घटनेची माहिती लोणी पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्ला झालेल्या कुटुंबियांच्या लोकांना संरक्षण दिले.

याप्रकरणी शारदा सुधाकर कोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात सुनील घोरपडे, सचिन घोरपडे, राजेंद्र घोरपडे, नारायण घोरपडे, सोमनाथ घोरपडे, वनिता घोरपडे, शिवनाथ घोरपडे, शुभम घोरपडे, रोहन निर्मळ, संजय कदम, नंदू निर्मळ, संदीप घोरपडे, कैलास घोरपडे, नितीन घोरपडे, दिपक निर्मळ आदींसह 71 जणांविरोधात अ‍ॅट्रोसीटीसह मारहाण व नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये काहीजण अनुसूचित जातीचे देखील आहेत.

या हल्ल्यामुळे घाबरलेल्या परिवाराने रात्रीपासून लोणी पोलीस स्टेशनचा आसरा घेतला असून लहान मुलाबाळांसह सर्वजण घाबरले आहेत. गावात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपर्ण शांतता आहे. या घटनेतील आरोपींना रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी अटक केलेली नव्हती. घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पिडीत कुटुंबियांनी केली आहे. या हल्ल्यामागे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या