Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगपिंगळा

पिंगळा

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

वासुदेव यांची भेट झाल्यानंतर दुसर्‍या कलाकारांशी मुलांची भेट झाली.

पांगुळ आला वं माय

- Advertisement -

दान दे व माय

शकून जाणून घे व माय

तुज भलं वईल वं माय

अशी हाक मारत हातातले कडमुडे वाजवत तो शकून ऐकण्याची घळ घालतो.

मुले वडिलांचे ऐकत त्या कलाकाराकडे पाहत होते. अंगात बंडी, त्यावर काळा कोट, धोतर, खांद्यावर घोंगडी, रंगीबेरंगी फेटा, फेट्यावर चांदीच्या पितळेचे मुखवटे नाणी असलेली पट्टी (यालाच चांद असे म्हणतात), कपाळ भरून पांढरे शुभ्र भस्म, त्यावर कुंकवाचा टिळा, काखेला झोळी, गळ्यात रूद्राक्षाची माळ असा त्याचा पोशाख. त्यांच्याकडे पाहून मुलांनी वडिलांना विचारले, या लोककलाकाराचे नाव काय? ही एक भटक्या भिक्षेकर्‍यांची जात पांगुळ किंवा पिंगळा असे यांना म्हणतात. ते अरुणोदयाच्या आधीच दारात येतात. ‘धर्म जागो’ असे ते म्हणत असतात. म्हणजेच शुभकामना व्यक्त करून दान मागतात.

कधी कधी हे पिंगळे पहाटेच्या वेळी एखाद्या झाडावर किंवा भिंतीवर बसलेले दिसतात. तेथूनच ते येणार्‍या-जाणार्‍यांकडे दान मागतात. हे भविष्य सांगतात.

कुडकुडे वाजवत भल्या पहाटे आपण आल्याची वर्दी देत परंपरेची चाल पुढे नेण्यासाठी मागणे मागतात. गावात येणारा हा भिक्षेकरी कोणीही पैसे अथवा धान्य स्वरुपात भिक्षा दिली की स्वतःभोवती गिरकी घेऊन उडी मारतो तेव्हा आपण समजावे की आपण दिलेले पाऊल म्हणजे दान पावले. पारंपरिक पद्धतीने आपले शुभचिंतन करतो.

पिंगळा महाद्वारीं । बोली बोलतो देखा ।

शकून सांगतो तुम्हा, हा एक ऐका ।

डुग डुग ऐका । डुग डुग ऐका

पिंगळा हा लोककला प्रकारही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा. पूर्वी अनेक लोक भविष्य पाहण्यासाठी पिंगळ्याचा आधार घेत. असे पिंगळ्यांनी वर्तवलेले भविष्य खरेच होते, अशी ग्रामीण भागात लोकांची समजूत होती. ती आजही तशीच असली तरी पिंगळा जात आता दुर्मिळ होत चाललीे आहेत.त्याप्रमाणे एखाद्या घराच्या अंगणात जाऊन तो घरातल्या माणसांबद्दल, भविष्याबद्दल, भवितव्याबद्दल काहीतरी विधान करतो. ते भवितव्य भविष्य म्हणून गणले जाते. घरातील वयस्कर स्त्रिया त्याला भरघोस शिधा, धान्य देतात. मग तो खूश होऊन आशीर्वादपर वक्तव्य करतो.

लोक त्याच्या म्हणजे, त्याच्या गळ्यातल्या देवाच्या पाया पडतात. आपल्या झोळीत पाडून घेऊनच तो पुढे जातो. राम प्रहर संपला की पिंगळा त्याचा दैनंदिन उपेक्षित जीवनात गुरफटून जातो.

पांगुळ गाणी म्हणून परमार्थाचा उपदेश करतात. दिवाळीनंतर येणार्‍या द्वादशीला पांगुळ नंदीची विधिपूर्वक पूजा करून त्यांच्या डोक्यावर शिवलिंग बांधतात आणि फेरी काढतात. या फेरीच्या वेळी ते कसरतीचे खेळ करतात. वासुदेवाप्रमाणेच पांगुळांना आणि इतर धर्म जागृतीचे काम करणार्‍या मागत्यांना दान दिले की पुण्यप्राप्ती होते, ही श्रद्धा सर्वसामान्य लोकांची असते. पिंगळ्या पक्षी जेव्हा ओरडतो तेव्हा तो भविष्यासंबंधी काही सुचवत असतो, अशी समजूत प्रचलित आहे. पिंगळा पक्ष्याची भाषा लोक ज्योतिषांना समजत असेल, असे मानले जाते. यावर विश्वास ठेवून लोक शकून विचारतात व दान देतात.

या समाजाचे एक वैशिष्ट्य भिशी आहे. ही भिशी अत्यंत मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते. लाखोंची उलाढाल होत असेल तरी त्यातला सच्चेपणा, नेकी सर्व व्यवस्थित.

पांगुळ भविष्य सांगताना हातातले कुडमुडे वाजवत शकून ऐकण्याची गळ घालतात. शकून सांगण्यासाठी त्यांच्याकडे चलाखी आहे. त वरून ताकभात ओळखणे त्यांना जन्मापासूनच जमते.

त्यांच्या शकून सांगण्यामुळे काही फायदे पण आहेत. अडचणीत असलेल्या माणसाला धीर मिळणे, मनोबल उंचावणे, दिवसभर येणार्‍या अडचणीला तोंड देणे त्यामुळे खंबीरपणे उभे राहता येते.

मराठी साहित्यात तेराव्या शतकापासून यांचा उल्लेख सापडतो. सर्व संतांनी यांच्यावर रूपके रचली आहेत. स्वामी समर्थ मात्र आध्यात्मिक भाषेत वर्णन करताना म्हणतात.

मी पणाचे मोडले पाय । म्हणून पांगळा जालो

तू पणाची कीर्ती जेई । ऐकूनिया शरण आलो ॥

पिंगळांना शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त मान मिळतो असे यांचे मत आहे, कारण शहरी भागात नऊ वाजेशिवाय कोणीही दार उघडत नाही.

परंतु या पांगुळांना शिवदरबारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मान होता. शत्रूच्या गोट्यातील इत्यंभूत बातम्या महाराजांना आणून देण्याचे काम हे करत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात हेरगिरीचे काम पांगुळ करत असत.

रात्र नुकतीच सरत असताना,

पण आता पोटापाण्यासाठी गावोगाव फिरण्यास पुढची पिढी तयार नाही. नवीन उद्योगधंदे निवडणे यामध्ये सैन्यात भरती, मिरवणुकीचे घोडे नाचवण्याचे कसब दाखवणे असे करून रोजीरोटीसाठी स्थिर आयुष्य जगणे हेच स्वप्न आहे. पण काहीजण अजूनही शकुनाचे काम करत आहेत. फक्त आपली संस्कृती टिकून राहावी म्हणून..

पिंगळ्यांच्या पालावर पहाट फुटतीये, पिंगळा पक्षी ओरडून त्यांनाच शुभशकून सांगत आहे.

बेळगावला एक पिंगळे गल्ली आहे. तिथे पिंगळ्यांची वस्ती पूर्वी होती आणि कदाचित अजूनही असावी.

पिंगळा बोलला पिंगळा बोलला

कुड कुड कुड रे

उठा उठा ग बायानू, फाटफट्या पाराला

जोगी आला दारात, धर्म वेळात हो.

आता पुन्हा पांगुळ किंवा पिंगळा दिसेल का हाच एक प्रश्न यानिमित्ताने वडिलांनी मुलांना सांगितला.

पुढे हे सर्वजण कोणत्या लोककलेकडे जातात ते पुढच्या भागात.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या