कर्जत |तालुका प्रतिनिधी| Karjat
तालुक्यातील बाजार समितीच्या प्रवेशद्वाराबाहेर तरुण आडत व्यापार्याला भरदिवसा पिस्तूलचा धाक दाखवत डोळ्यात मिरचीची पूड टाकून शनिवारी (दि.18) लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने कर्जत शहरात मोठी खळबळ उडाली आहे. कर्जत शहर व्यापारी असोसिएशन या घटनेचा निषेध केला आहे. घटनेबाबत माहिती अशी, कर्जत येथील आडत व्यापारी प्रफुल्ल पंढरीनाथ नेवसे यांचा मुलगा रामराजे (वय 21) शेतीमालाचे दीड लाख रुपये शेतकर्यांना देण्यासाठी बुलेटवरुन कृषी उत्पन्न बाजार समितीकडे येत असताना प्रवेशद्वाराजवळ पल्सरवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी रामराजे नेवसे यांना अडविले.
रामराजे यांनी बुलेट उभी करताच एका जणांनी डोळ्यांमध्ये मिरची पूड फेकली. त्यांनी चेहरा बाजूला केल्याने ती मिरची पूड शर्टवर पडली. त्यांनी तात्काळ बुलेट सोडून दिली आणि गळ्यातील पैशाची बॅग घट धरली. चोरट्याने बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीदरम्यान रामराजे यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून मार्केटयार्डमधील लोक घटनास्थळी येत असल्याचे पाहताच चोरटे पळ काढण्याच्या तयारीत असताना त्यांच्याकडील पिस्तूल खाली पडले. नेवसे यांनी ते उचलून चोरट्याच्या दिशेने रोखले. हे पाहून चोरट्यांनी दुचाकीवर राशीनच्या दिशेने धूम ठोकली. व्यापारी रामराजे नेवसे यांच्या पायाला दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मुलानी तातडीने पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पाळत ठेवून लुटण्याचा प्रयत्न झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. व्यापारी, नागरिक घटनास्थळी एकत्र आले. पोलिसांना जॅकेट परिधान करुन तोंडाला पांढरे रुमाल बांधलेले दोन चोरटे कर्जत शहराच्या दिशेने येत असतानचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या घटनेचा निषेध करत संरक्षण देण्याची मागणी व्यापार्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पोलीस प्रशासनाला तर मेनरोडपासून प्रवेशद्वाराच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच एक सुरक्षारक्षक कायमस्वरूपी नेमण्यात यावा या मागणीचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभय पाटील यांना दिले. यावेळी संचालक नंदकुमार नवले, प्रफुल्ल नेवसे, सराफ व्यापारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शहाणे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिभीषण खोसे, रवींद्र कोठारी, प्रसाद शहा, राम ढेरे, उपमनु शिंदे, विशाल छाजेड, सचिन बोरा, सुरेश नहार, सुषेन कदम, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, नगरसेवक भास्कर भैलुमे, रवींद्र सुपेकर, अनिल गदादे, धनंजय आगम, अतुल धांडे उपस्थित होते.