Saturday, June 15, 2024
Homeनगरजिल्हा परिषद, एमजेपीकडील पाणी योजनांचा आराखडा तयार करणार

जिल्हा परिषद, एमजेपीकडील पाणी योजनांचा आराखडा तयार करणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्ह्यात काही योजना विद्युत देयक थकीत यासह अन्य कारणांमुळे बंद आहे. त्याचा परिणाम संबंधित गावांना पाणीपुरवठा करण्यावर होत आहे. यामुळे टंचाई आणि निवडणुका संपल्यावर जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेकडील पाणी योजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित योजनांकडे काय अडचणी आहेत, हे समोर येऊन त्या सोडवता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमाठ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सध्या जिल्ह्यात 296 टँकरव्दारे 278 गावे आणि 1 हजार 500 वाड्या वस्त्यांवरील लोकांची पाण्याची तहान भागावण्यात येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही परिस्थिती बरी असली तरी काही वर्षापूर्वी यापेक्षा अधिक टँकर जिल्ह्यात सुरू होते. जिल्ह्यात काही चारा टंचाई होणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचा अहवाल होता. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्हा प्रशासनाने टँकर भरण्याचे बंद पडलेले पाण्याचे स्त्रोत कार्यान्वित करून घेतले आहे. यामुळे पाण्याचे टँकर वेळत भरण्यास मदत होत असून यामुळे पाण्याच्या नियोजित खेपा होण्यास मदत होत आहे. यासह टंचाईवर मात करण्यासाठी 64 ठिकाणी विहिरी आणि कूपनलीका अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सध्यातरी पाण्याचा काटकसरीने वापर महत्त्वाचा आहे.

जिल्ह्यातील बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी योजनांकडे त्यांचे लक्ष वेधले असता, टंचाई आणि निवडणुका संपल्यावर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील योजनांचा आराखडा तयार करण्याचा मानस जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला. यात संबंधित योजना किती गावांसाठी आहे, योजनेचे हस्तांतरण झाले की नाही. योजनेच्या वीज बिलाची स्थिती यासह अन्य बाबींचा त्या आराखड्यात समावेश करण्यात करण्यात येणार आहे. जेणेकरून संबंधित पाणी योजना कशाप्रकारे सुरू ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या निवडणुकीचा कालावधी सुरू असला तरी जिल्हा प्रशासनाचे जिल्ह्यातील पाणी टंचाईकडे जाणीवपूर्वक लक्ष असून आठ दिवसांतून एकदा टंचाईबाबत आढावा घेण्यात येऊन नागरिकांना पाणी आणि चारा उपलब्ध करण्यासंदर्भात नियोजन सुरू असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या