मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प (Budget of Mumbai Municipal Corporation )हा मुंबईकरांसाठी नसून वर्षा बंगल्यातून कंत्राटदार मित्रांसाठी छापून आलेला अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते (ठाकरे गट) आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray)यांनी शनिवारी टीका केली. महापालिका तोट्यात दाखवून मुंबईला दिल्लीच्या दारात कटोरा घेऊन उभे करण्याचा हा डाव आहे, असा आरोपही त्यांनी लागवला.
मुंबई महापालिकेचे प्रशासक आय. एस. चहल यांनी आज, मुंबई महापालिकेचा सन २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. अर्थसंकल्पात मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठीचे १ हजार ७०० कोटी हे मागच्या नगरसेवकांच्या निधीतून वळवले गेले. हा अधिकार आयुक्तांना कोणी दिला. ते स्वतःहून असे पैसे वळवू शकतात का? असा सवाल ठाकरे यांनी केला.
मुंबईत नव्या प्रकल्पांची आवश्यकता नाही, ही आपली पत्राद्वारे केलेली सूचना पालिकेने मान्य केली आहे. पण एकही नवा प्रकल्प नसताना पालिकेचे बजेट ५० हजार कोटींपुढे कसे गेले? स्कायवॉक नकोत अशी भूमिका असताना ७५ कोटींची तरतूद कशाला? अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली. राज्य सरकार साडेसात हजार कोटी मुंबई महापालिकेला देणे आहे. आता शिंदे-फडणवीस यांचे सरकार असून त्यांनी मुंबई महापालिकेला हे पैसे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्यात येत आहे. अर्थसंकल्प मांडणारही तेच आणि मंजूरही तेच करणार, हे लोकशाहीला धरून आहे का? २ हजार ५०० कोटीत होणारे रस्ते ६ हजार ५०० कोटींमध्ये होत आहेत. शिवसेनेने जनतेचा पैसा जपून वापरला. तसे आताही हा पैसा जपून वापरला पाहिजे, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला दिला.