Saturday, July 27, 2024
Homeनाशिकश्रावणी सोमवारनिमित्त सिटीलिंकच्या जादा बस फेऱ्यांचे नियोजन

श्रावणी सोमवारनिमित्त सिटीलिंकच्या जादा बस फेऱ्यांचे नियोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

श्रावणी सोमवारसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक कनेक्टिंग नाशिकच्या माध्यमातून 20 अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दर श्रावणी सोमवारी भाविकांच्या सुविधेसाठी नाशिक-त्र्यंबक दरम्यान 125 अतिरिक्त फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिलेल्या माहीतीनुसार सिटीलिंकच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वर बससेवा पुरविली जाते. या मार्गावर दररोज 25 बसेस प्रवाशांना सुविधा देतात. दर श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होते. या भाविकांच्यां सोयीसाठी प्रशासनाने दर श्रावणी सोमवारी नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर 20 अतिरिक्त बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजनात नाशिकरोडहून द्वारकामार्गे त्र्यंबकेश्वर अशा 10 बसेस, तर निमाणी त्र्यंबकेश्वर मार्गावर 10 अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहेत. अशा प्रकारे 25 नियमित व 20 अतिरिक्त अशा 45 बसेसच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वर दरम्यान 225 फेर्‍या श्रावणी सोमवारच्या दिवशी केल्या जाणार असल्याचे सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या सर्व गाड्या थेट त्र्यंबकेश्वर येथील सिटीलिंकसाठी उपलब्ध दिलेल्या बसस्थानकापर्यंत जाणार असल्याने भाविकांची गैरसोय टळणार आहे.

सोमवारी, शनिवारी गोदाघाट परिसरात वाहतूक बदल करण्यात आला आहे. श्रावण महिन्यानिमित्त गोदाघाट परिसरात तसेच कपालेश्वर मंदिरात देवदर्शन, रामकुंड आणि गंगाघाटावर स्नानासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

श्रावण महिन्यात दर शनिवारी आणि सोमवारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या दोन्ही दिवशी या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी बजावले आहेत. भाविकांच्या वाहनांमुळे कपालेश्वर मंदिर व रामकुंड परिसरात वाहूतककोंडी होते. त्यामुळे मालेगाव स्टॅण्ड ते श्री कपालेश्वर मंदिर, खांदवे सभागृह ते श्री कपालेश्वर मंदिर, सरदार चौक ते श्री कपालेश्वर मंदिर आणि ढिकले वाचनालय ते श्री कपालेश्वर मंदिर आदी मार्गावर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत वाहनांना प्रवेश बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या