अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे भरली असली, तरी गेल्या महिन्याभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकर्यांपुढे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून, याचा गांभीर्याने विचार करून हवामान खात्याच्या अधिकार्यांशी समन्वय साधून धरणांतील पाण्याच्या सिंचन व बिगर सिंचन आवर्तनाबाबत पुढील नियोजन केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात अनेक नवीन अधिकारी बदलून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पालकमंत्री विखे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विखे पाटील म्हणाले की, यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर चांगला पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत. मात्र, गेल्या महिन्याभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकर्यांपुढे दुबार पेरणीचे संकट दिसू लागले आहे. अशा स्थितीत भविष्यातील पिण्याचे पाण्याचे नियोजन व शेती आवर्तन पाणी नियोजन यासाठी हवामान खात्याच्या अधिकार्यांशी समन्वय साधून भविष्यातील पावसाची स्थिती कशी राहील हे जाणून घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास केल्या आहेत. त्यानुसार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन भविष्यात जिल्ह्यातील धरणातून सिंचन व बिगर सिंचन आवर्तन सोडण्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे, असेही ना. विखे म्हणाले.
सभागृहात ‘रम्मी’ खेळल्याच्या आरोपावरून सुरू झालेल्या वादावर पालकमंत्री म्हणाले की, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी स्वतः खुलासा केला आहे. सार्वजनिक जीवनात बोलताना संयम ठेवणे आवश्यक असले, तरी त्यांच्या मनात कोणतीही दुर्भावना नसते. मात्र काही वेळा त्यांचा उत्साह अनावर होतो. या प्रकरणावर अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरील आरोपांबाबत त्यांनी म्हटले की, या प्रकरणात कायदेशीर चौकशी होऊ द्यावी. चौकशीपूर्वी कोणालाही आरोपी ठरवून राजीनाम्याची मागणी करणे योग्य नाही. विरोधकांकडे पावसाळी अधिवेशनात कोणताही ठोस अजेंडा नव्हता. हेच महायुती सरकारचे यश असल्याचे सांगत विखे पाटील म्हणाले, विरोधकांकडून केवळ आरोप करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, सरकारच्या निर्णयांवरून जनतेचा महायुतीवरील विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
शनि देवाचा प्रक्षोभ व चमत्कार दिसेल
शनिशिंगणापूर येथील शनि देवस्थानसंदर्भात बनावट अॅप, नोकर भरती व अन्य तक्रारींबाबत बोलताना ना. विखे म्हणाले, शनिशिंगणापूरबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सविस्तर निवेदन केले आहे. अनेक गंभीर आरोप त्यात आहेत. त्यामुळे शनि संस्थानचे विश्वस्त मंडळ, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईलच, परंतु जागृत देवस्थान असलेल्या शनि देवाच्या तिजोरीत ज्यांनी हात घातला, त्यांना शनि देवाच्या प्रक्षोभाला व चमत्काराला सामोरे जावे लागेल, असा विश्वासही मंत्री विखे यांनी व्यक्त केला.




