संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गामधील रुंदीकरणात संपादित झालेल्या जमीनधारक शेतकर्यांना न्याय देणार असून लवकरच त्याबाबत सर्व अधिकार्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन पठारभागातील शिष्टमंडळास केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. संगमनेरच्या पठारभागातील बाधित शेतकर्यांना अद्याप पूर्णतः भरपाई दिलेली नाही. रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत, टोलनाका सुरू होऊन नऊ वर्षांचा कालावधी उलटूनही शेतकर्यांना पाचपट भरपाई नाही. लवादाचे कामकाज व्यवस्थित होत नाही, असे अनेक प्रश्न घेऊन किशोर डोके, संजय मंडलिक, डॉ. किशोर पोखरकर, प्रताप गुंजाळ, संजय देशमुख, विनय आहेर आदींचे शिष्टमंडळ नुकतेच नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या भेटीसाठी गेले होते.
यावेळी त्यांनी आस्थेने सर्वांची विचारपूस केली. महामार्गाची कोणती कामे अपूर्ण आहेत याची माहिती घेत सर्वांना पाचपट भरपाई का मिळाली नाही असा प्रश्न उपस्थित केला. याबाबत सविस्तर माहिती निवेदनाद्वारे ना. गडकरी यांना देण्यात आली. पठारभागातील सर्व ग्रामपंचायतींचे ठराव यावेळी सादर करण्यात आले. त्यावर सर्व अधिकार्यांची बैठक घेऊन लवकरच तुमचा प्रश्न सोडवतो असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी नागपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक शेळके, चिमूरचे ज्येष्ठ नेते डॉ. दीपक यावल उपस्थित होते.