मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
दिल्लीहून १६ कोटी २४ लाख रूपये किंमतीचे रेडमी कंपनीचे मोबाईल घेवून जाणारा ट्रक लुटल्याची खोटी तक्रार देत पोलिसांची दिशाभुल करणार्या चालकाचा बनाव तालुका पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी या संदर्भात संशयित चालकासह त्याच्या साथीदाराला जेरबंद करीत त्यांच्याकडून १५ कोटी ३३ लाख २९ हजार ८६६ रूपये किंमतीचे मोबाईल फोन जप्त केले आहेत.
यासीर हुकूमुद्दीन (रा. रूपनगर, हरियाणा) हा ८ ऑक्टोंबररोजी दिल्ली येथून आयशर टेम्पो क्र. के.ए.-४२-बी-६५९० या वाहनाने मोबाईल फोन घेवून निघाला होता. हा टेम्पो रविवारी तालुक्यातील वर्हाणे शिवारातील एका पेट्रोलपंपाजवळ आला असता अज्ञात इसमांनी टेम्पो अडवून आपल्याला ओलीस ठेवले व सर्व मोबाईल बॉक्स लुटून नेल्याची तक्रार त्याने तालुका पोलिसात दिली होती.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुंजाळ व उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ सेंगर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाची तपासणी केली असता जबाबातील विसंगतीमुळे हा प्रकार बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चालक यासीर याला ताब्यात घेवून त्याला पोलीसी खाक्या दाखवला असता त्याने कट रस्त्याची कबुली दिली.
घोडेगाव येथील यासीरचा मित्र इरफान आझ मोहंमद खान याच्या मदतीने ही चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नियोजनानुसार मनमाड रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ इरफान पिकअप घेवून आला. त्यानंतर आयशरमधून रेडमी कंपनीचे १७६ मोबाईल बॉक्स पिकअपमध्ये भरण्यात आले. हे मोबाईल इरफान याने घोडेगाव परिसरातील एका बंद पोल्ट्री शेडमध्ये लपवून ठेवले होते.




