अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत देशभरात पीएम ई-बस सेवा योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत देशातील 169 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यात पाच लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये नगर शहराचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेतून नगर शहराला 50 पर्यंत ई-बसेस उपलब्ध होऊ शकणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रकल्प अहवाल सादर करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली.
पीएम ई-बस सेवा योजनेसाठी केंद्र सरकारने 16 ऑगस्ट रोजी 20 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून 169 शहरांना तब्बल 10 हजार ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 20 ते 40 लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 150, 10 ते 20 लाख व 5 ते 10 लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 100 व 5 लाखांच्या आतील लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी 50 पर्यंत ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तीन दिवसांपूर्वी सर्व 169 शहरांच्या अधिकार्यांची दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठकही पार पडली. यात सरकारने आढावा घेतला असून, सर्व शहरांना प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्यस्तरीय समितीकडे सादर करावा लागणार आहे. राज्यस्तरीय समितीच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारच्या समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. नगर महापालिकाही प्रकल्प अहवाल तयार करून सुमारे 50 बसेसची मागणी करणार असल्याचे आयुक्त जावळे यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकार या ई बसेस खरेदीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी उपलब्ध करून देणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नुसार हा प्रकल्प राबवला जाणार आहे. केंद्र सरकार एकूण प्रकल्प किंमतीच्या 60 टक्के निधी देणार आहे. उर्वरीत निधीसाठी राज्य सरकारकडून हमीपत्र घेतले जाणार आहे.