अहिल्यानगर (प्रतिनिधी)
महिनाभरापासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने-चे वेबसाईट बंद असल्याने आधार सिडिंग (आधार प्रमाणिकरण), लॅण्ड सिडिंग (जमीन प्रमाणिकरण), केवायसीसह योजनेच्या अर्जाची माहिती मिळवण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. योजनेचे पैसे खात्यावर का पडले नाहीत ? याबाबतची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी बँकांसह कृषी कार्यालय, सेतू केंद्रात हेलपाटे घालत असून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष सहा हजार रुपये हस्तांतरित केले जातात. केंद्र सरकारने योजनेचा २१वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला होता. अहिल्यानगर जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. परंतू काही लाभार्थीचे अनेक महिन्यांपासून योजनेचे हप्ते मिळणे बंद झाले आहेत. २०१९ साली पीएम किसान योजना सुरू झाली होती, त्यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यात सात लाखांहून अधिक शेतकरी लाभार्थी होते. परंतु शासनाने लाभार्थ्यांची छाननी केल्यानंतर पन्नास टक्क्यांनी शेतकऱ्यांची संख्या कमी झाली. यामध्ये अल्पवयीन मुलांचे नावे, एका कुटुंबात एकापेक्षा अधिक लाभार्थी तसेच पती-पत्नी दोघे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांचे नाव वगळले आहेत.
शेतकऱ्यांना फटका बसला
केंद्र व राज्य सरकारने अपात्र लाभार्थीची पडताळणी करण्याचे निर्देश कृषी व महसूल विभागाला दिले होते. या लाभार्थीची छाननी होत असताना काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळीपणाने अनेक शेतकरी अपात्र ठरले होते. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला. आता या शेतकऱ्यांना पात्र असल्याचे पुरावे सादर करावे लागत आहेत.
हप्ता बंद होण्याचे कारण
जमिनीचे प्रमाणिकरण (लॅड सिडिंग) नसणे, ई-केवायसी नसणे, बँक खाते आधार लिंक नसणे, बँक खात्याला डीबीटी नसणे, दुसऱ्यांचे आधार लिंक असणे, मोबाइल नंबर लिंक नसणे, आधार किंवा बँकेचे नाव चुकीचे असणे आदी कारणांनी योजनेचे हप्ते बंद झाले आहेत. वरील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पीएम किसानची वेबसाइट सुरू असणे गरजेचे आहे. याबाबत कृषी विभागाला विचारले असता शासनाकडून वेबसाइट अपडेट केली जात असल्याचे सांगण्यात आले.




