Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशकोरोना : पंतप्रधान मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन

कोरोना : पंतप्रधान मोदींचे आर्थिक मदतीचे आवाहन

सार्वमत

टाटा सन्सकडून 1500 कोटी रुपयांची मदत
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वाढणार्‍या कोरोनाशी(कोविड-19) लढा देण्यासाठी देशातील जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांच्या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सहाय्यता आणि आपत्कालिन स्थिती मदत निधीफची (पीएम-केअर्स) स्थापना केली आहे. सर्व क्षेत्रातील लोकांना या निधीमध्ये आपली मदत पाठवता येणार आहे.

- Advertisement -

पंतप्रधान या निधीबाबत माहिती देताना म्हणाले, हा निधी स्वस्थ भारत घडवण्यासाठी मोठा मार्ग तयार करेल तसेच सर्व क्षेत्रातील लोक या निधीमध्ये दान करु शकतात. माझं सर्व भारतीयांना आवाहन आहे की, त्यांनी पीएम-केअर्स निधीत योगदान द्यावे. या निधीद्वारे यापुढे येणार्‍या अशा प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी मदत होईल.

दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये टाटा ग्रुपने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. टाटा ट्रस्टने केंद्र सरकारला विविध उपाययोजनांसाठी 1000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर याआधी 500 कोटी रुपयांच्या मदतीची शनिवारी घोषणा केली. एकूण 1500 कोटी टाटा ट्रस्ट शासनाला मदत म्हणून देणार आहे.

तर देशासमोर उभ्या असलेल्या कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारला मदत म्हणून वाहनउद्योग श्रेत्रातील बजाज समुहाने 100 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच कोरोनाचा हा वाढता धोका लक्षात घेता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार मदतीला धावला आहे. अक्षय कुमारने प्रधानमंत्री सहायता निधीला 25 कोटी रुपयांची मदत केली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था अशी ओळख असलेल्या बीसीसीआयनेही या लढ्यात आपला सहभाग नोंदवला आहे. पंतप्रधान मदतनिधीला बीसीसीआय ५१ कोटींचा निधी देणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या