दिल्ली । Delhi
भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन आज देशभर उत्साहात साजरा होत आहे. राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. देशाच्या प्रगतीचा आढावा घेताना आणि विविध घडामोडींवर भाष्य करताना पंतप्रधानांनी यंदाच्या दिवाळीत देशवासीयांना ‘मोठे गिफ्ट’ देण्याची घोषणा केली.
मोदी म्हणाले, “यंदा दिवाळीत आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म आणणार आहोत. गेल्या आठ वर्षांत जीएसटी व्यवस्थेत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या आहेत. आता काळाची गरज ओळखून पुढील पिढीतील सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एमएसएमई क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे आणि आम्ही हे उद्दिष्ट लवकरच साध्य करू.”
अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, महागाई सध्या नियंत्रणात आहे, परकीय चलन साठा मजबूत आहे आणि जागतिक रेटिंग एजन्सी भारताच्या प्रगतीचे कौतुक करत आहेत. “गरीब, शेतकरी, महिला आणि मध्यमवर्गीयांना वाढत्या अर्थव्यवस्थेचा थेट लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. नवीन क्षेत्रांमध्ये नवनवीन संधी निर्माण होत आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
कृषी क्षेत्राचा उल्लेख करताना मोदींनी सांगितले की, गेल्या वर्षी देशातील शेतकऱ्यांनी धान्य उत्पादनात सर्व विक्रम मोडले आहेत. आज भारत दूध आणि डाळींच्या उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे, तर मत्स्य उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर. तसेच तांदूळ, गहू, फळे आणि भाज्यांच्या उत्पादनातही भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष दिवशी पंतप्रधान मोदींची दिवाळीतील ‘मोठ्या गिफ्ट’ची घोषणा देशातील उद्योग, व्यापारी आणि सामान्य नागरिकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे. नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म नेमके कसे असतील, याची सविस्तर माहिती पुढील काही महिन्यांत मिळेल, मात्र पंतप्रधानांच्या भाषणानंतर देशभरात आर्थिक सुधारणांबाबत चर्चांना उधाण आले आहे.




