नवी दिल्ली – लॉकडाउन संपल्यानंतर दहा मुख्य निर्णयांसह तयार रहा असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांना म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेला लॉकडाउन न वाढवण्याचे संकेत दिले आहेत.
त्यांनी सोमवारी केंद्रीय मंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. लॉकडाउनच्या काळातले निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे तसंच लॉकडाउन संपल्यानंतर आवश्यक धोरणं आखणं गरजेचं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.
त्यानंतर त्यांनी हे संकेत दिले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. हा लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत आहे. त्यामुळे त्यापुढे काय? लॉकडाउन आणखी वाढणार की संपणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. कारण लॉकडाउनमुळे अवघा देश ठप्प झाला आहे. हातावरचं पोट असलेले हजारो कामगार रस्त्यावर आले आहेत. त्यांच्यासाठी सरकार उपाय योजना करतं आहे. मात्र तरीही लॉकडाउन संपणार की नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. तूर्तास तरी मोदींनी लॉकडाउन संपेल असे संकेत दिले आहेत.
सोमवारी दुपारीच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदारांचे 30 टक्के वेतन कपात करण्यात येईल असे सांगितले. वर्षभरासाठी म्हणजेच 12 महिन्यांसाठी हा निर्णय असणार आहे. लॉकडाउन संपणार का? हा प्रश्न त्यांनाही विचारण्यात आला होता. मात्र याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन संपल्यानंतर काय करायचं ते मंत्र्यांना विचारलं आहे. त्यामुळे लॉकडाउन वेळेवर संपेल अशी शक्यता आहे.