नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गुजरातच्या कच्छमध्ये आले आहेत.
गुजरातमधील कच्छमध्ये पंतप्रधान मोदींनी दिवाळीनिमित्त सैनिकांना प्रोत्साहन दिले. त्यांनी सैनिकांशी संवादही साधला, त्यांची विचारपूस केली. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी जवळपास एक तास तिथे थांबले होते. पंतप्रधानांनी जवानांना स्वत:च्या हाताने भरवली मिठाई.
पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच गुजरातमध्ये
केवडिया येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी कच्छमध्ये पोहोचले. दरम्यान, पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच गुजरातमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यापूर्वी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती.
पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. तर, २०२२ च्या दिवाळीला पीएम मोदी कारगिलमध्ये होते. त्यावेळी त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली होती. देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी दरवर्षी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदा सियाचीनमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गेले होते. २०१५ मध्ये पंतप्रधान मोदींनी अमृतसरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.
वर्ष 2016: हिमाचल प्रदेशात सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. वर्ष 2017: बांदीपोरा, जम्मू आणि काश्मीरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. वर्ष 2018: उत्तरकाशी, उत्तराखंडमध्ये ITBP सोबत दिवाळी साजरी केली. वर्ष 2019: राजौरी, जम्मू आणि काश्मीरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. वर्ष 2020: राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. वर्ष 2021: जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. वर्ष 2022: कारगिलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. वर्ष 2023: हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा