नवी दिल्ली – कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वेगवेगळ्या सबलीकरण गटांची स्थापना केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडे उपलब्ध असलेल्या सामुग्रीचा आणि साधनांचा कसा वापर करता येईल, यासंदर्भात काय तयारी पूर्ण झाली आहे या गोष्टींवर हा गट लक्ष ठेवणार आहे. दरम्यान देशात आतापर्यंत कोरोनाचे 29 बळी गेले असून बाधितांची 1190 वर पोहचली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाची रविवारी एक बैठक झाली. या बैठकीमध्येच कोरोनाविषयक 11 गटांची स्थापना करण्यात आली. या 11 वेगवेगळ्या गटांमध्ये मोदी सरकारमधील वरिष्ठ सरकारी अधिकार्यांचाही समावेश आहे. पहिला गट हा आरोग्य विषयक आप्तकालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी निती आयोगाचे सदस्य असणारे डॉक्टर व्ही पॉल यांच्याकडे देण्यात आली आहे.
दुसर्या गटाकडे देशातील रुग्णालये, अलगीकरण (क्वारंटाइन) आणि विलगीकरण (आयसोलेशन) कक्षांची उपलब्धता तसेच आजाराचा प्रादुर्भाव किती वाढत आहे, चाचण्या आणि आपत्कालीन उपचार केंद्रे यांच्यासंदर्भात काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
याचबरोबर आरोग्य उपकरणे, रुग्णांच्या जेवणाची आणि औषधांची सुविधा, खासगी क्षेत्रातील रुग्णालये, मदत करणार्या कंपन्या आणि सेवाभावी संस्थांशी समन्वय ठेवणे, लॉकडाउनसंदर्भातील विषयांकडे लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गटांची स्थापना करण्यात आली आहे.