Monday, June 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPM Modi Swearing Ceremony : मंत्रिपदासाठी दिल्लीतून फोनाफोनी सुरु; महाराष्ट्रातील 'या' खासदारांना...

PM Modi Swearing Ceremony : मंत्रिपदासाठी दिल्लीतून फोनाफोनी सुरु; महाराष्ट्रातील ‘या’ खासदारांना लागली लॉटरी

उत्तर महाराष्ट्रालाही मिळाला बहुमान, कुणाला संधी?

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) आज देशात नवे सरकार स्थापन होणार आहे. संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात एनडीए सरकारचा (NDA Government) शपथविधी सोहळा पार पडणार असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, त्यापूर्वी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या खासदारांना फोनाफोनी सुरू झाली आहे. यात महाराष्ट्रातून भाजपमधील नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्यासह शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना मंत्रिपदासाठी फोन आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील एका महिला खासदारालाही मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंच्या शिवसेनेकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना मंत्रिपदासाठी फोन आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित झाले आहे. मात्र, त्यांना अद्याप फोन आला नसल्याची माहिती मिळत आहे. तर उत्तर महाराष्ट्रातून रावेरच्या नवनिर्वाचित खासदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना देखील दिल्लीतून मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वेळी उत्तर महाराष्ट्रातून दिंडोरीच्या तत्कालीन खासदार डॉ. भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यावेळी पवार यांच्याकडे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी पराभव केला आहे. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या आठ जागा असून त्यापैकी महायुतीने केवळ दोन जागा जिंकल्या आहेत. यामध्ये जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ आणि रावेरमधून रक्षा खडसे विजयी झाल्या आहेत. त्यातच आता रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा खासदार झाल्याने त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

आतापर्यंत ‘यांना’ आले मंत्रिपदासाठी फोन

१) जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा २) जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल ३) अनुप्रिया पटेल, अपना दल ४) डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी ५) के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी ६) नितीन गडकरी, भाजप ७) राजनाथ सिंह, भाजप ८) अमित शाह, भाजप ९) अर्जुनराम मेघावाल, भाजप १०) पियुष गोयल, भाजप, ११) मनसुख मांडविय, भाजप १२) ज्योतिरादित्य शिंदे, भाजप १३) रक्षा खडसे, भाजप १४) रामदास आठवले (रिपाइं (ए)) १५) रामनाथ ठाकुर, जनता दल युनायटेड १६) एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर, १७) सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन १८) चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) १९) प्रतापराव जाधव, शिवसेना (शिंदे गट)

- Advertisment -

ताज्या बातम्या