Saturday, July 27, 2024
Homeनगरपंतप्रधान मोदी यांच्याहस्ते ‘आयुष’ रूग्णालयाचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते ‘आयुष’ रूग्णालयाचे उद्घाटन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नऊ कोटी रुपये खर्च करून येथील तारकपूर रस्त्यावर उभ्या राहिलेल्या आयुष रुग्णालयाचे गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शिर्डी येथून दुरदृश्य प्रणालीव्दारे उद्घाटन झाले. भारतीय प्राचीन उपचार पध्दती असलेल्या या रुग्णालयात पंचकर्म, योगा, ध्यानधारणेसोबतच युनानी पध्दतीने रुग्णांवर उपचार होणार आहेत. नगर लोकसभेचे खा. डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हे 30 बेडचे आयुष रुग्णालय साकारले आहे.

- Advertisement -

याप्रसंगी सहायक संचालक आयुष मुंबई डॉ. सुरेश घोलप, राज्य कार्यक्रम अधिकारी एनआरएचएम मुंबई डॉ. प्रशांत भुईर,अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. बापूसाहेब गाडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मनोज घुगे, वैद्यकीय अधीक्षक आयुष डॉ.सुदाम बागल, आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.शौनक मिरीकर, युनानी तज्ज्ञ डॉ.इर्शाद मोमीन आणि डॉ.नाझीया शेख, होमिओपॅथीक डॉ.जयश्री म्हस्के आणि डॉ. शोभा धुमाळ, नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ.वैद्यनाथ गुरवले, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. निलेश गायकवाड, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.अमोल शिंदे, इंजि. अंकुश पाटील (नाशिक), उपअभियंता जी.बी.काळे, व्ही.डी.आडेप,पी.आर. गाडे, आय.एस. शेख आणि उदय देशपांडे, अजित फुंदे, सचिन पारखी, प्रवीण मुथ्या उपस्थित होते.

33 हजार चौरस फुटांवर या रुग्णालयाची इमारत तयार झाली असून, एकूण 30 बेडचे हे रुग्णालय असून येथे आयुर्वेद, होमिओपॅथी, योगा, युनानी, सिध्द यांसारख्या पॅथींद्वारे उपचार केले जातील. विशेष म्हणजे आयुर्वेदातील आधुनिक पध्दतीचा वापर करून रुग्ण लवकरात लवकर बरा होण्याचे काम येथील तज्ज्ञ डॉक्टर करणार आहेत. याठिकाणी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमांतर्गत रुग्णांवर उपचार होणार आहेत. दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांना या उपचार पध्दतीचा सर्वाधिक लाभ होणार आहे. त्यात कॅन्सर, सांधेवात, त्वचारोग, टॉन्सिलचे आजार, तसेच किडनी विकारांवरही उपचार मिळतील.

तज्ज्ञ डॉक्टर व आयुर्वेदातील आधुनिक उपचार पध्दती हे आयुष रुग्णालयाचे वैशिष्ट्ये आहे. रुग्णालयात योगासाठी मोठा हॉल आहे. तेथेही रुग्णांवर योग पध्दतीने उपचार होणार आहेत. रुग्णालयातील आवश्यक डॉक्टर आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हे रुग्णालय आता रुग्णांच्या सेवेत राहणार आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज सुमारे बाराशे रुग्ण तपासणीसाठी येतात. तर सुमारे 450 रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात. या रुग्णांपैकी शेकडो रुग्णांवर आयुष रुग्णालयात आयुर्वेदिक पध्दतीने उपचार होणार आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची संख्या कमी होण्यास आयुषचा हातभार लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या