Friday, December 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजLoksabha Elections 2024 : ४ जून इंडिया आघाडीची 'एक्सपायरी डेट'; पंतप्रधान मोदींचा...

Loksabha Elections 2024 : ४ जून इंडिया आघाडीची ‘एक्सपायरी डेट’; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

अहमदनगर | Ahmednagar

देशासह राज्यात आज तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) प्रक्रिया पार पडत आहे. तर चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार आहे. या चौथ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान (Voting) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. त्यावेळी मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

- Advertisement -

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारा जिल्हा म्हणून अहमदनगरची (Ahmednagar)ओळख आहे. आज देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. प्रत्येक ठिकाणी भाजपला समर्थन मिळत आहे. यात तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ती म्हणजे ४ जून रोजी इंडिया आघाडीची (India Allience) ‘एक्सपायरी डेट’ निश्चित केली आहे. त्यानंतर इंडिया आघाडीचे झेंडे उचलायलाही कोणी सापडणार नाही. निवडणुकीआधी जो भानूमतीचा कुणबा झाला होता तो मातीच्या किल्ल्यासारखा ४ जून नंतर ढासळणार आहे”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

पुढे बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला महाराष्ट्राच्या भूमीवर पाकिस्तानने घडवून आणला होता की नाही? आपले जवान कोणामुळे शहीद झाले, आपल्या निष्पाप लोकांची हत्या कोणी केली? हे सत्य जगाला माहीत आहे. आपल्या देशाच्या न्यायालयांनी निकाल दिला आहे, पाकिस्ताननेही तो मान्य केला आहे, पण काँग्रेस पक्ष दहशतवाद्यांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र देत आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे. एनडीएचा मुद्दा विकास, सुरक्षा, सन्मान आणि स्वाभिमान आहे. मात्र काँग्रेस यामधील कोणत्याही मुद्द्यावर बोलत नाही. काँग्रेसने ५० वर्ष केवळ गरिबी हटविण्याचे नारे दिले आहेत. जर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आले तर ते गोरगरिबांचे आरक्षण काढून घेऊन मुस्लिम लोकांना देतील. स्वतःच्या वोट बँकेला खुश करण्यासाठी ते हा प्रयत्न करत आहेत”, असा आरोपही यावेळी नरेंद्र मोदींनी केला.

तसेच “आमचे सरकार तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार आहे. रेल्वे, एअरपोर्टचा विकास करणे याकडे आमचे लक्ष आहे. शिर्डीच्या भाविकांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी, आम्ही प्रयत्नशील आहोत. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचे काम १९७० साली सुरू झाले होते. त्यावेळी धरण तयार करण्यासाठी ८ कोटी रुपये लागत होते. मात्र, आता त्याची किंमत पाच हजार कोटी झाली असून हे पाप काँग्रेसने (Congress) केले आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. तसेच यंदाची निवडणूक (Election) ही संतुष्टीकरण विरुद्ध तुष्टीकरण, अशी आहे. भाजपकडून देशावासियांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तर इंडिया आघडीच्या नेत्यांकडून तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असेही मोदी म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या