
बिहार | Bihar
बिहारच्या दरभंगा येथे झालेल्या काँग्रेसच्या मतदार अधिकार यात्रेत पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करण्यात आली होती. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या व्यासपीठावरून मोदींच्या आईचा अपमान करण्यात आला. एका व्यक्तीने यात्रेच्या मंचावर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द काढले होते. या व्यक्तीला लगेचच अटकही करण्यात आली. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगावर भाष्य केले असून आपल्या आईबद्दल अपशब्द काढल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
बिहारच्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कमी दरात कर्ज उपलब्ध करणे, त्यांना आवश्यक सहकार्य करणे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या व्यासपाठीवरून झालेल्या शिवीगाळीचा उल्लेख केला. आईचा उल्लेख होताच ते भावूक झाले. भोजपुरी भाषेत त्यांनी बिहारमध्ये आईचे स्थान देवीदेवतांपेक्षा वरचे मानले जाते, माझ्या आईने गरिबी पाहिली आहे. आईचे आपले जग असते, आईच आपला स्वाभिमान असतो. ही समृद्ध परंपरा असणाऱ्या बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी जे घडले, त्याची मी कल्पनाही केली नव्हती, बिहारमधल्या जनतेनेही हा विचार केला नव्हता असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ही शिवीगाळ फक्त माझ्या आईचा अपमान करणारी नाही. तर देशातील माता, भगिनी आणि सर्वच महिलांचा अपमान करणारी आहे. मला माहिती आहे. या प्रसंगाबद्दल ऐकून बिहारच्या प्रत्येक आईला वाईट वाटले असेल. माझ्या हृदयात जितके दुःख आहे, तितकेच बिहारच्या लोकांनाही दुःख झाले आहे, याचीही मला कल्पना आहे.”
राजकारणाशी संबंध नसलेल्या माझ्या आईला राजकारणात का ओढले जात आहे? असाही प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. आरजेडी आणि काँग्रेसने माझ्या आईचा राजकारणासाठी गैरवापर का केला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महिला उद्योजकता आणि स्वावलंबन यावर बिहारमध्ये एका नवीन सहकारी उपक्रमाचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी हे भावना व्यक्त केली.
प्रत्येक आई आपल्या मुलाला मोठ्या तपस्येने सांभाळते, मुलांपेक्षा मोठे आईपुढे काहीच नसते. मी माझ्या आईला लहानपणापासून असेच पाहतोय. गरिबी आणि संकटाचा सामना करून माझ्या आईने आम्हा भावंडांना वाढवले. पाऊस पडायचा तेव्हा घरात छतातून पाणी गळू नये यासाठी ती मेहनत घ्यायची. स्वत: आजारी पडली तरी आम्हाला कळू द्यायची नाही. ती सतत काम करत राहायची. जर तिने एक दिवसही आराम केला तर मुलांना वेदना होतील हे तिला कळायचे. मुलांसाठी नवनवीन कपडे घ्यायची, स्वत: साडीही खरेदी करत नव्हती. देशातील कोट्यवधी आई असेच मुलांना सांभाळत असेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




