अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत जमिनीची मोजणी करणार्या स्वामित्व योजनेअंतर्गत देशभरातील 65 लाख लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने मिळकत पत्रिकांचे वितरण करण्यात आले. त्याअनुषंगाने नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पंतप्रधान मोदी यांच्या लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान अचानक बत्तीगूल झाली. यामुळे सभागृहात अंधार झाला. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर काही वेळ अंधारात बसण्याची वेळ आली.
शनिवारी देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने मिळकत पत्रिकांचे वितरण करण्यात आले. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षपण करण्यात आले होते. कार्यक्रम दुपारी 12 च्या दरम्यान सुरू झाला. सुरूवातीला केंद्रीय मंत्री यांचे मनोगत झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी काही निवडक राज्यातील योजनेत पात्र असणार्या लाभार्थी यांच्याशी थेट संवाद साधण्यास सुरूवात केली. यात स्वामित्व योजनेमुळे त्यांच्या जीवनात काही फरक झाला का? योजनेतील प्रॉपर्टी कार्डवर त्यांना कर्ज मिळाले का? मिळालेल्या कर्जातून त्यांनी काही व्यवसाय सुरू केला का? आदी प्रश्न पंतप्रधान मोदी विचारत होते. ही चर्चा लाईव्ह सुरू असतांना जिल्हाधिकारी कार्यालयातील बत्ती गूल झाली. यामुळे मोदी यांच्या लाईव्ह कार्यक्रमात खंड झाला. साधारपणे पाच मिनीट विज खंडीत होती.
यावेळी सभागृहात कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अविनाश मिसाळ यांच्यासह विभागाचे अधिकारी आणि जिल्हाभरातील स्वामित्व योजनेतील लाभार्थी उपस्थित होते. साधारण पाच मिनिटांनी वीज पुन्हा अवतरली. त्यानंतर लाईव्ह कार्यक्रमाला सहभागी होण्यासाठी काही वेळ लागला. दरम्यान, देशाचे सर्वोच्च नेते असणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच लाईव्ह कार्यक्रमात नगरमध्ये बत्तीगूल झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने याबाबत महावितरणच्या अधिकार्यांकडे गायब झालेल्या विजेबाबत स्पष्टीकरण मागितले असता दर शनिवारी नगर शहरात भारनियमन होत असते. या भारनियमनाचा फटका बसल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता, असे उत्तर देण्यात आले. दरम्यान, विजेच्या भारनियमनातून जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम देखिल सुटला नाही, याची चर्चा होती.
नागरिकांच्या मालमत्तांचे संवर्धन व संरक्षण होणार- ना.शिंदे
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत जमिनीची मोजणी करणार्या स्वामित्व योजनेअंतर्गत देशभरातील 65 लाख लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने मिळकतपत्रिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले, ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन या आधुनिक तंत्रांचा उपयोग करत नागरिकांच्या मालमत्तांचे संवर्धन आणि संरक्षण करणारी ही स्वामित्व योजना आहे. अहिल्यानगर जिल्हा नेहमीच राज्याला दिशा देणारा जिल्हा आहे. ग्रामीण भागामध्ये मालमत्तांच्या भेडसावणार्या प्रश्नाच्या मूळाशी जाऊन अत्यंत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे.
आधुनिक तंत्राच्या सहाय्याने नागरिकांच्या मालमत्तांचे संवर्धन आणि संरक्षण यातून होणार आहे. विकसित भारत देशाचे स्वाभिमानी आणि अभिमानी नागरिक म्हणून प्रत्येकाने स्वच्छतेची सवय अंगिकारली पाहिजे. आपले घर,गाव,तालुका व जिल्हा स्वच्छ करण्याबरोबरच आरोग्यासाठी घातक असलेल्या नशा आणणार्या पदार्थाच्या सेवनापासून दूर राहिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी अविनाश मिसाळ यांनी स्वामित्व योजनेची माहिती विषद केली. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना मिळकतपत्रिकांचे, महाज्योती संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टॅबचे वितरणही करण्यात आले.उपस्थितांना स्वच्छतेची व नशामुक्तीची शपथही यावेळी देण्यात आली.
स्वामित्वमध्ये राज्य देशाला दिशादर्शक ठरले – मंत्री विखे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरामध्ये ग्रामीण विकासाला नवी चालना देण्याच्यादृष्टीने स्वामित्व योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2019 मध्ये या योजनेची अंमलबजावणी करत 23 लक्ष 33 हजार मिळकत पत्रिकांचे वाटप केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतून राज्य देशाला दिशादर्शक ठरले असल्याने याचा सार्थ अभिमान असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. स्वामित्व योजनेतून ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे एक महत्वाचे पाऊस आज या निमित्ताने टाकण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात 81 ठिकाणी 604 गावांतून 57 हजार 731 मिळकत पत्रिकांचे वाटप या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. योजनेतून शहरी विकासाबरोबरच ग्रामीण भागाचा विकास साधण्यात येणार आहे.
ग्रामीण भागामध्ये अनेकवेळा घरगुती तसेच शेती जमीनीचे वाद होताना दिसतात. परंतू स्वामित्व योजनेतून ड्रोनद्वारे करण्यात येणार्या सर्व्हेमुळे हे वाद संपुष्टात येऊन नागरिकांना त्यांच्या मिळकतीचा दाखला अत्यंत सहज व सुलभपणे मिळणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. जल, जंगल आणि जमीन या त्रिसूत्रीवर आधारित देशाच्या विकासाचे नवीन पर्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झाले आहे. विकसित भारताच्या संकल्पनेला या योजनेतून अधिक गतीने चालना मिळून प्रत्येक नागरिकाला त्यांचा अधिकार प्राप्त होणार आहे. योजनेतून गावाच्या विकासाबरोबरच नागरिकांचा विकासही अत्यंत वेगाने होणार असल्याचेही जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले.