नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज ‘मन की बात’ (Mann ki Baat) या त्यांच्या रेडिओ कार्यक्रमाच्या १२१ व्या भागामध्ये देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यावर (Pahalgam Attack) भाष्य करत पीडित कुटुंबांना (Families) न्याय देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जेव्हा मी तुमच्याशी मनापासून बोलतो तेव्हा माझ्या मनात खूप वेदना होतात. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने प्रत्येक नागरिकाला दुःख झाले आहे. प्रत्येक भारतीयाची शोकग्रस्त कुटुंबांबद्दल तीव्र सहानुभूती आहे. दहशतवादी आणि त्यांचे आका काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करू इच्छितात आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला. दहशतवादाविरुद्धच्या आपल्या या लढाईत संपूर्ण जग १४० कोटी भारतीयांसोबत उभे आहे. ही एकता दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की,त्यांना न्याय मिळेल, न्याय नक्कीच मिळेल. या हल्ल्यातील गुन्हेगारांना (Criminal) आणि कट रचणाऱ्यांना सर्वात कठोर उत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे (Terrorist Attacks) फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त सळसळ करत आहे. हा हल्ला दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा भ्याडपणा दर्शवितो. या काळात काश्मीरमध्ये शांतता परतत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, बांधकाम कामांना अभूतपूर्व गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. मात्र, हे देशाच्या शत्रूंना, जम्मू आणि काश्मीरच्या शत्रूंना हे आवडले नाही. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून सतत शोक व्यक्त केला जात आहे. तसेच अनेक जागतिक नेत्यांनीही मला फोन केले असून, पत्रे आणि संदेश पाठवले आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकाचा मृत्यू झाला. जे दहशतवादी यामध्ये सहभागी झाले त्यांच्या घरावर बुलडोझरची कारवाई केली जात आहे. तसेच त्यांना मदत केली त्यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात येत आहे. तर या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे लक्षात येताच भारताने कठोर कारवाई करत सिंधु जल करार रद्द केला आहे. त्यासोबतच व्यापार देखील बंद केला आहे.