मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यासाठी भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर बड्या नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. पंतप्रधान मोदी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण आठ सभा घेणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे राज्यात जास्तीत जास्त जाहीर सभा घेणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात ८ दिवस सभा होणार आहेत. येत्या ७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात असणार आहे. या काळात ते महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभा फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतल्या जाणार आहेत. या सर्व सभांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही महाराष्ट्रात १५ सभा होणार आहेत. तसेच गोवा, मध्यप्रदेश, हरियाणातील मुख्यमंत्री हे देखील महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. पण नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडली. त्यामुळे आता महाराष्ट्रात पक्षांऐवजी दोन आघाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने असणार आहेत. महायुती सरकारमध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे.
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दुप्पट सभा गृहमंत्री अमित शाहांच्या होणार आहेत. अमित शाह हे महाराष्ट्रात २० सभा घेणार आहेत. या सभा राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांत होणार आहेत. या सभांची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र दिवाळीनंतर भाजपकडून प्रचाराचा नारळ फोडला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रात कोणाच्या किती सभा?
पंतप्रधान मोदी – ८
अमित शहा – २०
नितीन गडकरी – ४०
देवेंद्र फडणवीस – ५०
योगी आदित्यनाथ – १५
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा