Wednesday, May 22, 2024
Homeनगरपंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी 1 हजार एसटी बसचे नियोजन

पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी 1 हजार एसटी बसचे नियोजन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 26 ऑक्टोबर रोजी शिर्डीत होणार्‍या कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांची ने-आण करण्यास 1 हजार एसटी बसचे नियोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यासाठी इतर जिल्ह्यांतूनही बस मागवल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन 26 ऑक्टोबर रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी समन्वय राखत त्यांना नेमून देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

- Advertisement -

या कार्यक्रमामध्ये विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटपही करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी कार्यक्रमस्थळी आणण्याची व परत सोडण्याची वाहतूक व्यवस्था करावी करण्यात येणार आहे. सुमारे 1 लाख नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. यात 60 ते 70 हजार लाभार्थी आहेत. गावोगावी विविध शासकीय लाभ घेतलेले किंवा लाभ मंजूर झालेले लाभार्थी कार्यक्रमासाठी जाणार आहेत. त्यांना त्यांच्या गावातून कार्यक्रमस्थळी नेणे व पुन्हा गावात आणून सोडण्याचे नियोजन असून ही वाहतूक एसटी बसने केली जाणार आहे. 17 ऑगस्ट रोजी शिर्डी येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठीही अशीच एसटीने वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळीही सुमारे 800 बस वापरण्यात आल्या होत्या. आताही त्याच धर्तीवर बसगाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे.

एसटीवर परिणाम नाही

शासन आपल्या दारी कार्यक्रमावेळी जिल्ह्यातील बस मोठ्या प्रमाणात शिर्डी येथे गेल्याने प्रवाशांची गैरसोय झाल्याची ओरड झाली होती. त्यामुळे यावेळी खबरदारी घेत एसटी महामंडळाने नियमित दैनंदिन फेर्‍यांमध्ये बदल केलेला नाही. जेवढ्या बस जिल्ह्यासाठी लागणार आहेत, त्या वगळून इतर जिल्ह्यांतून बस मागवल्या जाणार आहेत. जिल्ह्यात 600 बस आहेत. त्या न वापरता सर्व बस बाहेरील जिल्ह्यांतून आणणार असल्याची माहिती एसटीच्या अधिकार्‍यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या