दिल्ली | Delhi
संसदेचं विशेष अधिवेशन आज सोमवारपासून सुरु होत आहे. संसदेच्या नवीन इमारतीमध्ये हे सत्र भरवण्यात येत असून संसदेत दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. हे अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचं असेल, असं सूचक वक्तव्य पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान 3 आणि G-20 शिखर संमेलनाच्या यशाचं उल्लेख करताना भारताचं सामर्थ्य संपूर्ण जगाने पाहिल्याचं म्हटलं. पंतप्रधान म्हणाले की, मून मिशनचे यश… चांद्रयान-3, आपला तिरंगा फडकवत आहे. शिवशक्ती पॉईंट नवीन प्रेरणा केंद्र बनलं आहे. या पॉईंटमुळे आपला ऊर अभिमानाने भरला आहे. भारताला अभिमान वाटावा असे क्षण एकामागून एक आले आहेत. संपूर्ण देशात उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण आपण अनुभवत आहोत. त्याचवेळी संसदेचे हे अधिवेशन होत आहे. हे सत्र लहान असले तरी वेळेच्या दृष्टीने खूप मोठं आहे. हे अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचं असेल, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारताच्या उज्ज्वल भविष्याचा काळ सुरु झाला आहे. काल विश्वकर्मा जयंती होती. देशातल्या विश्वकर्मा समूदायाचा जो परंपरागत व्यवसाय आहे तो त्यांना आधुनिक पद्धतीने करता यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. देशामध्ये उत्सवाचं वातावरण आहे, देशात नवीन आत्मविश्वास आपण अनुभव करत आहोत.