Sunday, July 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजModi 3.0 : पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारताच मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी; घेतला 'हा'...

Modi 3.0 : पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारताच मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी; घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काल रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. हा भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडला. या शपथविधी सोहळ्याला परदेशी पाहुणे तसेच देशभरातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते. यावेळी मोदींसह एनडीएच्या एकूण ७२ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे कालपासून खऱ्या अर्थाने देशात मोदी सरकार ३.० हे नवे पर्व सुरु झाले आहे.

यानंतर आता पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले असून जवळपास १६ तासांतच शेतकऱ्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांसाठी पीएम शेतकरी सन्मान निधीचा (Shetkar Samman Nidhi) १७ वा हफ्ता जारी केला आहे. या योजनेंतर्गत जवळपास २० हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून याचा देशभरातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांचे कल्याण हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे समर्पित आहे. त्यामुळे स्वाक्षरी करण्यात येणारी पहिली फाईल ही शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित असावी, हे उचित होते. त्यामुळे यापुढेही शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी काम करीत राहू, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांचा पीएम शेतकरी योजनेअंतर्गत पीएम शेतकरी सन्मान निधीचा १६ वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या २८ तारखेला बँक खात्यात जमा झाला होता. त्यानंतर आता लवकरच १७ वा हप्ता बँक खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. या योजनेअंतर्गत ही रक्कम एकावेळी न देता दोन-दोन हजार करीत वर्षातून तीनवेळा बँक खात्यात पाठवली जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या