Tuesday, July 16, 2024
Homeमुख्य बातम्या“२०१४ च्या आधी फोन हँग व्हायचे, त्यामुळे लोकांनी…”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक...

“२०१४ च्या आधी फोन हँग व्हायचे, त्यामुळे लोकांनी…”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला

दिल्ली | Delhi

- Advertisement -

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज (27 ऑक्टोबर) इंडिया मोबाईल काँग्रेसचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी भारतातील बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल भाष्य केलं. देशात 5G चा वेगाने प्रसार होत असल्याचं म्हणतानाच त्यांनी 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याचं नाव घेत, काँग्रेसला खोचक टोलाही लगावला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, की आमच्या सरकारच्या काळात 4G चा वेगाने विस्तार झाला. तसंच सध्या 5G चा देखील विस्तार होत आहे. 6G तंत्रज्ञानाच्या बाबतीत देखील आम्ही पुढाकार घेतला असून, याबाबत भारत देश जगाचं नेतृत्व करेल. या सगळ्यात आमच्यावर कोणताही डाग आला नाही, हे विशेष. नाहीतर, 2G तंत्रज्ञानावेळी काय झालं होतं, हे सर्वांना माहितीच आहे.

नाव न घेता पंतप्रधानांनी काँग्रेसला चिमटे काढले. ते म्हणाले, 2014 हे एक महत्त्वाचं वर्ष आहे. तुम्ही 10-12 वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्याकाळचे मोबाईल अगदी आउटडेटेड होते. त्यांच्या स्क्रीन सारख्या हँग होत होत्या. परिस्थिती एवढी वाईट होती, की रिस्टार्ट करुन, बॅटरी चार्ज करुन किंवा बॅटरी बदलून देखील फायदा नव्हता. अशीच परिस्थिती त्याकाळच्या सरकारचीही होती. 2014 नंतर मात्र लोकांनी असे आउटडेटेड फोन वापरणं सोडून दिलं, आणि आम्हाला सेवेची संधी दिली. या बदलामुळे काय फरक पडला हे स्पष्टच आहे.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 2014 पूर्वी देशात सुमारे 100 स्टार्टअप होते. ही संख्या आज 1 लाखांच्या वर गेली आहे. अगदी कमी काळात आपण युनिकॉर्न कंपन्यांचं शतक पूर्ण केलं आहे. तर, जगातील टॉप 3 स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये भारताचा समावेश झाला आहे. देशातील स्टार्टअप्सना प्रेरणा देण्यासाठी इंडियन मोबाईल काँग्रेसने ‘अस्पायर’ अभियानाची सुरुवात केली आहे.

2014 पूर्वी देशात मोबाईल फोन आयात केले जात होते. मात्र, भाजप सत्तेत आल्यानंतर आज आपला देश मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन निर्यात करत आहे. देशात 5G मोबाइल सेवा जलद सुरू झाल्याचे सांगत एका वर्षात चार लाख 5G बेस स्टेशन स्थापित करण्यात आल्याचे यावेळी मोदींनी सांगितले. मोबाईल ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारत 118 व्या स्थानावरून आता 43 व्या स्थानावर पोहोचल्याचे सांगत मोदींनी 6G मध्ये भारत आघाडीची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला. भांडवल, संसाधने आणि तंत्रज्ञानात प्रवेश हे सरकारचे प्राधान्य असून, आज संपूर्ण जग ‘मेड इन इंडिया’ फोन वापरत आहे. असाही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या