Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याPM मोदींनी चार वर्षांपूर्वीच केली होती आजच्या अविश्वास प्रस्तावाची भविष्यवाणी, पाहा VIDEO

PM मोदींनी चार वर्षांपूर्वीच केली होती आजच्या अविश्वास प्रस्तावाची भविष्यवाणी, पाहा VIDEO

दिल्ली । Delhi

मणिपूर हिंसाचाराने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ज्याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही (Monsoon Session) उमटताना पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी मोदी सरकारकडून मणिपूर मुद्दावर चर्चा करण्यास तयारी दाखवण्यात आली नव्हती. त्यामुळेच विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी केली होती. या मागणीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परवानगी दिली आहे. दरम्यान या सर्व राजकीय घडामोडीदरम्यान पंतप्रधान मोदींचा २०१८ मधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदींनी २०२३ मध्ये विरोधीपक्ष अविश्वास ठराव मांडेल असं म्हटलं होतं.

- Advertisement -

२०१८ साली शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी बिलाच्या मुद्द्यावरूनही विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणला होता. यावर सभागृहामध्ये जवळपास ११ तास चर्चा झाली. यानंतर मतदान झालं, ज्यामध्ये विरोधी पक्ष पराभूत झाला. अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ त्यावेळी १२६ आणि विरोधात ३२५ मतं पडली. त्यावेळी मोदी सरकार या लढाईमध्ये सहज जिंकलं होतं.

पुढे देसाई बोलत होते, मागे सत्तारांनी पुडीच काढली… काँग्रेसनं शेअर केला Video

दरम्यान या व्हायरल व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी उपहासात्मक पद्धतीने विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. विरोधकांनी २०२३ मध्ये अविश्वास ठराव आणण्याची तयारी करावी असं मोदी सांगताना दिसत आहेत. लोकसभेमध्ये २०१८ साली अविश्वास प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी, मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला २०२३ मध्ये पुन्हा एकदा अविश्वास ठराव आणण्याची संधी मिळो, यासाठी माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत, असा उपहासात्मक टोला लगावला. मोदींनी २०१८ मधील अविश्वास ठरावाला उत्तर देताना काँग्रेसवर निशाणा साधला होता. हा अहंकाराचाच परिणाम आहे की ज्या काँग्रेसच्या एकूण जागांची संख्या एकेकाळी ४०० हून अधिक होती त्यांची संख्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ४० झाली. सेवा करण्याची भावना असल्यामुळेच भारतीय जनता पार्टीने २ जागांवरुन सुरुवात करुन आपल्या जीवावर या आकड्यापर्यंतचा प्रवास केला आहे, असंही मोदी म्हणाले होते.

लोकसभेत विरोधक आक्रमक…

मणिपूरमधील दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओवरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्द्यावरून संसदेतही वातावरण अधिकच तापलं असून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर संसदेमध्ये निवेदन करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळाटाळ करत असल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. संतप्त झालेल्या विरोधकांनी आज लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस अध्यक्षांकडे दिली आहे. आता या अविश्वास ठरवाच्या निमित्ताने तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवर निवदेन देतील, अशी आशा विरोधकांना आहे.

अविश्वास ठराव कुणाच्या बाजूने जाणार?

लोकसभेत केवळ भाजपच्या खासदारांची संख्या तीनशेपार आहे. त्यामुळं विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाचा मोदी सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. विरोधकांनी ठराव मांडला तरी निकाल मात्र सरकारच्याच बाजूने लागणार आहे. परंतु तरीही विरोधी पक्षांकडून अविश्वास ठराव मांडण्यात आल्यामुळं राजकीय जाणकारांच्या भूवया उंचावल्या आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत यूपीएचं विसर्जन करत ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळं मणिपुरच्या प्रश्नावर पहिल्यांदाच संसदेत विरोधी पक्ष एकवटल्याचं पाहायला मिळत आहे.

इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडियाच्या नावातही ‘INDIA’; पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

- Advertisment -

ताज्या बातम्या