नागपूर | वृत्तसंस्था | Nagpur
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) दिवशी नागपूर जिल्ह्याच्या (Nagpur District) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राष्टीय स्वयंसेवक संघाचे पहिले संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी ‘जिथे सेवा आहे, तिथे स्वयंसेवक आहे, असे गौरवोद्गार काढत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्याचे कौतुक केले.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “कोणत्याही देशाचे अस्तित्व हे त्या देशातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या त्याच्या संस्कृतीच्या (Culture) विस्तारावर अवलंबून असते. आपल्यावर एवढे परकीय हल्ले झाले, आपली संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले, तरी भारतीय संस्कृतीची चेतना मिटली नाही. कारण ही चेतना जागृत ठेवणारे अनेक आंदोलन (Agitation) भारतात होत राहिले आहे. भक्ती आंदोलन त्याचचं एक उदाहरण आहे. आमच्या संतानी समाजात ती चेतना निर्माण केली. महाराष्ट्रातील शेकडो संतांनी, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी हे काम केले ते पुढे स्वामी विवेकानंद यांनी सुरू ठेवले. स्वामी विवेकानंदांनी निराशात असलेल्या समाजाला जागे केले, त्यांना त्यांच्या स्वरुपाची आठवण करून दिली. त्यांच्यातील आत्मसन्मान जागवले, त्यांनी राष्ट्रीय चेतना विझू दिली नाही”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “गुलामीच्या अखेरच्या काळात डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींनी त्याला नवीन ऊर्जा देण्याचे काम केले. आज आपण पाहत आहोत की राष्ट्रीय चेतनेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जे विचार बीज १०० वर्षापूर्वी पेरले ते महान वटवृक्ष बनून जगासमोर आहे. सिद्धांत आणि आदर्शाने या वटवृक्षाला उंची दिली असून कोट्यवधी स्वयंसेवक हे त्याच्या फांद्या आहेत. हे साधारण वटवृक्ष नाही, संघ भारताच्या (India) अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षय वट आहे. हा अक्षय वट आज भारताच्या संस्कृतीला आपल्या राष्ट्राच्या चेतनेला निरंतर ऊर्जावान बनवत आहे,” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी संघ आणि स्वयंसेवकांच्या सेवा कार्याची स्तुती केली.
तसेच “माधव नेत्रालय आरोग्य क्षेत्रात याच प्रयत्नांना पुढे नेत आहे. गरीब आणि वयोवृद्ध लोकांना उपचारांची चिंता सतावू नये, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे कोट्यावधी लोकांना मोफत आरोग्य सुविधा मिळेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक संस्कार आहे, जो आंतरिक दृष्टी आणि बाह्यदृष्टी दोन्हीसाठी कार्य करत आहे. बाह्य दृष्टीने माधव नेत्रालयाचा जन्म झाला, तर आंतरिक दृष्टीने संघाला सेवेचा पर्याय बनवले आहे. ही सेवा, संस्कार आणि साधना पिढ्यानपिढ्या प्रत्येक स्वयंसेवकाला प्रेरणा देत आहे. त्याला निरंतर गतिमान ठेवते आणि त्यामुळे स्वंयसेवक कधीही थकत नाही”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) म्हटले.