वाराणासी | Varanasi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यावरुन मोदींनी काँग्रेससह सपावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला आहे आणि बदला घेण्याचे त्यांचे वचन पूर्ण केल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांनी यावेळी यावर भर दिला की, ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे गुन्हेगार देखील मारले गेले आहेत. हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या वेळेवरुन ही मोदींनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.
पंतप्रधान मोदी शनिवारी वाराणसीमध्ये होते. येथे विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी समाजवादी पक्षाच्या ‘व्होट बँकेच्या राजकारणा’वर सडकून टीका केली. पाकिस्तान, काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “पाकिस्तान अस्वस्थ आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण काँग्रेस आणि समाजवादी पक्ष पाकिस्तानच्या वेदना सहन करू शकत नाहीत. तिकडे पाकिस्तान रडत आहे आणि इथे काँग्रेस व समाजवादी पक्ष दहशतवाद्यांची अवस्था पाहून रडत आहेत. काँग्रेस सतत आपल्या सैन्याच्या शौर्याचा अपमान करत आहे. काँग्रेसने ऑपरेशन सिंदूरला ‘तमाशा’ म्हटले आहे.”
दहशतवाद्यांना मारण्यासाठी तुम्हाला फोन करायचा का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना म्हंटले की, “वोटबँक आणि तुष्टीकरणाच्या या राजकारणात समाजवादी पक्षही मागे नाही. त्यांचे नेते प्रश्न विचारत होते की, या विशिष्ट दिवशीच पहलगाम दहशतवादी का मारले गेले? कोणतीही कारवाई करण्यापूर्वी मी त्यांना फोन करून विचारायचे का? सामान्य ज्ञान असलेल्या कोणालाही उत्तर देता येईल की, दहशतवाद्यांना मारण्यासाठी आपण वाट पाहण्याची गरज आहे का?
हे तेच आहे जे दहशतवाद्यांना क्लिन चिट देतात
पंतप्रधान मोदी आक्रमक होत समाजवादी पक्षाच्या पूर्वीच्या सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “हे तेच लोक आहेत, जे सत्तेत असताना दहशतवाद्यांना क्लीन चिट देत होते. बॉम्बस्फोट करणाऱ्या दहशतवाद्यांवरील खटले मागे घेत होते. आता त्यांना दहशतवादी मारले गेल्याने त्रास होत आहे, ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्याने त्रास होत आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मी ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच काशीला आलो आहे. जेव्हा २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, तेव्हा २६ निष्पाप लोक इतक्या क्रूरपणे मारले गेले होते. माझे हृदय वेदनेने भरले होते. तेव्हा मी बाबा विश्वनाथांना प्रार्थना करत होतो की, त्यांनी सर्व पीडित कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची हिंमत द्यावी. माझ्या मुलींच्या सिंदूरचा बदला घेण्याचे मी जे वचन दिले होते ते देखील पूर्ण झाले आहे. हे केवळ महादेवाच्या आशीर्वादाने शक्य झाले आहे.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





