मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आजपासून (बुधवार) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra Tour) आहेत. या दौऱ्यात ते मुंबईकरांसाठी (Mumbai) दोन महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. यामध्ये बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे आणि मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत असलेली मेट्रो एक्वा लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचा समावेश आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (New Mumbai Airport) लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नामांकनासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. त्यासाठी सर्वपक्षीय आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले होते. अखेर राज्य सरकारने लोकनेते दि.बा पाटील (D.B. Patil) यांच्या नावाला मान्यता दिली आहे. त्यानंतर आज या विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.
तर मुंबईतील वाहतूक क्षेत्रातील अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई मेट्रो मार्गिका ३ च्या (Metro 3) अंतिम टप्प्याचे उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते होणार आहे. मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन) ही मुंबईची पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन आहे. जी ३३.५ किलोमीटरच्या कॉरिडॉरसह २७ स्थानकांना जोडते. यामुळे दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरांपर्यंत प्रवास करणे सोपे आणि सोयीस्कर होणार आहे. यापूर्वी मेट्रो-३ दोन टप्प्यांत म्हणजे आरे ते बीकेसी (BKC) आणि बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) अशी सुरु होती. आज अंतिम टप्प्याचे लोकार्पण होत आहे.
विमानतळाची १९,६५० कोटी रुपये खर्चून उभारणी
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज उद्घाटन होणारे मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे. सुमारे १९,६५० कोटी रुपये खर्चून हे विमानतळ बांधण्यात आले आहे.
मेट्रो लाइनवर एकूण ३७, २७० रुपये खर्च
पंतप्रधान मोदी आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंत पसरलेल्या मुंबई मेट्रो लाईन ३ च्या (Mumbai Metro Line 3) अंतिम टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पावर सुमारे १२,२०० कोटी खर्च झाला असून संपूर्ण मेट्रो लाइनवर एकूण ३७, २७० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे. मेट्रोचा हा प्रकल्प मुंबईतील प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.




