नवी दिल्ली | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज गुजरातमधील वनतारा वाइल्ड लाईफचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभयारण्यात फेरफटका मारला. त्यानंतर त्याची काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या या अभयारण्यात दोन हजाराहून अधिक प्रजाती आणि दीड लाखांहून अधिक संकटात सापडलेल्या आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांची काळजी घेतली जाते. यामध्ये आशियाई सिंह, बिबटे, लांडगे, गेंडे, मगरी आणि हत्ती यांचा समावेश असून हा वनतारांचा संवर्धन प्रकल्प संपूर्ण जगात अद्वितीय आहे.
पंतप्रधान मोदी वंतराच्या हिरव्यागार परिसरात पोहोचताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पारंपरिक नृत्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले, तर शास्त्रीय संगीताचा गजर परिसरात घुमत होता. गेटवर त्यांचे स्वागत मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिकाने केले. तर नीता अंबानी यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिलक लावला आणि त्याचवेळी २२ शंखांचा नाद घुमला.
तर पंतप्रधान मोदींनी फीत कापताच, ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. याशिवाय वनतारात प्रवेश करण्यापूर्वी, पंतप्रधान मोदी आणि अंबानी कुटुंबीयांनी अंबा माता मंदिरात जाऊन पूजा- आरती केली. वंतराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली आहे, जी या सेवाकार्यास ‘देवसेवा’ म्हणून दर्शवते. पंतप्रधान मोदी अत्याधुनिक सुविधा पाहण्यासाठी फिरत असताना, अनंत अंबानी त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी संपूर्ण प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर आहेत. ते मानतात की वन्यजीवांचे संरक्षण करणे ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्यांनी वनताराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा ते आश्चर्यकारक नव्हते. वनताराला ‘प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. तसेच या अभयारण्यामध्ये केवळ प्राण्यांना सांभाळलं जात नाही.तर त्यांच्यासाठी रुग्णालय देखील उपलब्ध करून दिला जातो. यामध्ये प्राण्यांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जातात. या रुग्णालयामध्ये वन्यजीव भूल हृदयरोग नेफरोलॉजी इंडॉस्कॉपी दंतचिकित्सा या विविध आजारांवर उपचाराने औषध विभाग देखील कार्यरत आहे.