Saturday, July 27, 2024
Homeनगरपोहेगाव परिसरात दुबार पेरणीचे संकट

पोहेगाव परिसरात दुबार पेरणीचे संकट

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव परिसरात पोहेगाव, सोनेवाडी, देर्डे कोर्‍हाळे, देर्डे चांदवड आदी परिसरात शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये खरिपाची पेरणी केली होती. मात्र गेले पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे या परिसरात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

- Advertisement -

परिसरात सध्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकर्‍यांनी गेल्या महिन्यात झालेल्या पावसावर सोयाबीन, मका, कपाशी, भाजीपाला आदी पिकांची पेरणी केली. कृषी सेवा केंद्र चालकांकडून सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली असल्याची माहिती मिळते आहे. मका पिकाचे क्षेत्रही वाढले आहे. काही शेतकर्‍यांनी नगदी पीक म्हणून कपाशीची लागवड केली आहे. पेरणी झाल्यापासून पावसाने या परिसरात ओढ दिल्यामुळे सध्या उगवण झालेली पिके कोमेजून जात आहे.

मागच्या वर्षी खरिपामध्ये शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा फटका बसला. सरकारने शेतकर्‍यांना अतिवृष्टीची मदत जाहीर केली मात्र वर्ष उलटून गेले तरी अजूनही परिसरातील बरेचशे शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित राहिले आहे. खरिपाची पेरणी करण्यासाठी शेतकर्‍यांना मोठा आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. शेत नांगरणीपासून तर पेरणी पर्यंत शेतकर्‍यांना एकरी 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो. काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली.

आता पावसाने ओढ दिली असून शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकर्‍यांच्या सोयाबीन बियाण्यांची ही उगवण झाली नसल्याने खरीप वाया जाण्याची भीती निर्माण होत आहे. जर अजून दोन पाच दिवसांत पाऊस बरसला नाही तर शेतकर्‍यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या