Monday, May 20, 2024
Homeनगर10 हजारांची लाच मागितली; पोलीस अंमलदार गजाआड

10 हजारांची लाच मागितली; पोलीस अंमलदार गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विरोधी गटाकडून दिली जाणारी तक्रार किरकोळ सुरूवात घेऊन प्रकरण मिटवून घेण्याच्या मोबदल्यात पोलीस अंमलदाराने 30 हजार रुपयांची लाच मागणी करून 10 हजार रूपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. नंदलाल मुरलीधर खैरे असे त्या पोलीस अंमलदाराचे नाव असून ते एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

- Advertisement -

येथील लाचलुचपत विभागाने अंमलदार खैरे विरोधात बुधवारी (दि. 11) गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील तक्रारदार यांच्या कुटुंबाचे शेजारी राहणार्‍या कुटुंबासोबत कचरा गोळा करून पेटवून देण्याच्या कारणावरून 10 जुलै रोजी वाद झाला होता. सदर वादात तक्रारदार यांची भावजयी किरकोळ जखमी झाली होती म्हणून तक्रारदार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास अंमलदार खैरे करत होते. ते तक्रारदार यांच्या घरी पंचनामा करण्याकरिता गेले होते. त्यावेळी अंमलदार खैरे यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुमचे शेजारी हे तुमच्यासह भावाविरूध्द विनयभंगाची तक्रार देणार आहे.

विनयभंगाची तक्रार न घेता किरकोळ तक्रार घेऊन प्रकरण मिटवून घेण्याच्या मोबदल्यात खैरे याने 30 हजार रुपये लाच मागणी केल्याची तक्रार येथील लाचलुचपत विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने 26 जुलै रोजी लाच मागणी पडताळणी केली असता अंमलदार खैरे याने तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रुपयांची मागणी करून 10 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. म्हणून अंमलदार खैरे याच्याविरूध्द बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संतोष शिंदे, विजय गंगुल, रमेश चौधरी, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, सचिन सुद्रुक, हारूण शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या