Wednesday, July 15, 2026
HomeनगरAhilyanagar : सराईत गुन्हेगाराशी संबंध; अंमलदार चौधरी निलंबित

Ahilyanagar : सराईत गुन्हेगाराशी संबंध; अंमलदार चौधरी निलंबित

श्रीरामपूरमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एसपी सुदर्शन यांची कठोर कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

श्रीरामपूर येथील एका सराईत गुन्हेगाराशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या पोलीस अंमलदार शंकर चौधरी याला पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निलंबित केले आहे. श्रीरामपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शंकर चौधरी हा सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. यापूर्वी त्याची नेमणूक श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात होती.

- Advertisement -

मात्र, गुटखा तस्करीशी संबंधित कथित हप्तेखोरीच्या आरोपांनंतर तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी त्याची बदली पोलीस मुख्यालयात केली होती. त्यानंतरही त्याच्या विरोधातील तक्रारी कायम राहिल्याने अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समजते. श्रीरामपूर शहरात अलीकडील काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैय्या यांच्या खुनानंतर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून सलग तिसर्‍या दिवशीही बंद पाळण्यात आला. या घटनेनंतर गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. दरोडे, खून, वाळू तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांशी काही पोलीस कर्मचार्‍यांचे संबंध असून त्यांच्या अवैध धंद्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांमध्ये पोलीस अंमलदार चौधरी याचे नावही पुढे आले होते.

चौधरी याचे खून वाळू तस्करी, दरोडा अशा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारासोबतचे काही फोटो मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी श्रीरामपूरमध्ये आंदोलनही करण्यात आले होते. तसेच राज्याचे पोलीस महासंचालक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. यानंतर वैजापूर पोलीस ठाणे हद्दीत वाळू तस्करांनी शेतकर्‍याला मारहाण केली त्यावेळी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये देखील गुन्हेगारांकडून चौधरीचे नाव घेतले गेले होते. हा विषय अधिक चर्चेत आला होता. श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत असताना गुन्हेगारांशी कथित संबंध असल्याच्या आरोपांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी चौधरी याच्यावर निलंबनाची कारवाई करून अशा प्रकारांना सहन केले जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, गुन्हेगारांवर वेळेवर आणि प्रभावी कारवाई होत नसल्यामुळेच गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याची टीका सातत्याने होत आहे. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा गुन्हा घडूच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अशा परिस्थितीत पोलीस कर्मचार्‍यांचे गुन्हेगारांशी कथित संबंध समोर आल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात आज सर्वपक्षीय मोर्चा; सलग तिसर्‍या दिवशीही शहर कडकडीत...

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरातील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या श्रीरामपूर बंदला मंगळवारी सलग तिसर्‍या दिवशीही व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला....