सिन्नर | वार्ताहर Sinnar
तालुक्यातील विंचुरदळवी येथील व्यापारी विलास उर्फ बजरंग आबाजी दळवी (५०) यांच्या खुनातील फरार मुख्य आरोपीला सिन्नर पोलिसांनी सापुतारा टोलनाक्यावर सापळा रचून अटक केली.
प्रेम बाळू पवार (१९) रा. विंचुर दळवी असे आरोपीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी व्यापारी विलास दळवी यांचा भावदेवाडी रोडवरील नाल्यात मृतदेह आढळला होता. तपासाअंती आरोपी अजय सोमनाथ पवार, आकाश भाऊसाहेब मोरे, प्रेम पवार आणि एक अल्पवयीन साथीदार यांनी विटेने डोक्यात मारून दळवी यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून दोन आरोपी व एक अल्पवयीन मुलास केवळ दोन तासांत अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी प्रेम हा फरार होता. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने फरार आरोपीचा शोध सुरू ठेवला. गुप्तबातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेम हा वणी परिसरातून सापुताराकडे जात असल्याचे पोलिसांना समजले.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाने वणी-सापुतारा येथील पांडाने टोलनाक्यावर सापळा रचला आणि आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खोटे नाव सांगितले. मात्र, पुढील तपासात त्याची खरी ओळख पटली. प्रेस यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, आप्पासाहेब काकड, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांनी या कारवाईत भाग घेतला.




