मुंबई | Mumbai
सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तसेच या दुर्घटनेनंतर आरोप प्रत्यारोप होत आहे. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट असलेला आरोपी चेतन पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई केली आहे. आता चेतन पाटील याची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे चौकशीत आणखी काय गोष्टी समोर येतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवताना चेतन पाटील याने चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन केले होते. पुतळा कोसळल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर एफआरआर दाखल केला. याशिवाय पुतळा तयार करणाऱ्या जयदीप आपटे याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला.
चेतन पाटील काय म्हणाला?
चेतन पाटील हा स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून सिंधुदुर्गातील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचे काम करत होता. त्याने केलेल्या दाव्यानुसार पुतळ्यासाठी जे फाऊंडेशन (चबुतरा) उभारला होता, त्याचे डिझाईन त्याने नौदलाला तयार करुन दिले होते. यापलीकडे त्याला नौदलाकडून कोणतीही वर्क ऑर्डर किंवा पत्र प्राप्त झालेले नाही, असा दावा चेतन पाटील याने केला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे काम केले होते, ते ठाण्यातील कंपनीने केले होते, असे चेतन पाटीलने स्पष्ट केले होते.
पुतळा पुन्हा उभारणार
मुख्यमंत्र्यांनी याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला गती दिली आहे. यासाठी त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी नुकत्याच काही शिल्पकारांच्या भेटीही घेतल्या आहेत. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी काल वर्षा निवासस्थानी विशेष बैठक घेतली होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा