संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील पानोडी ते वरवंडी घाटात दरोड्याच्या तयारीतील टोळी (Robbery Gang) आश्वी पोलिसांनी शुक्रवारी (दि. 17) रात्री बारा वाजेच्या सुमारास पकडली. या कारवाईत पोलिसांनी नऊ जणांपैकी तिघांना गजाआड केले तर उर्वरित सहा जणांनाही निष्पन्न केले असून, वाहनासह लाकडी दांडे, लोखंडी रॉड, दोरी, मिरची पावडर पुडी, दोन मोबाइल असा 4 लाख 11 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे.
याबाबत आश्वी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की पानोडी ते वरवंडी घाटात रस्त्याच्या कडेला दरोडा (Robbery) टाकण्याच्या उद्देशाने नऊ जण बसलेले असल्याची पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पकडले. त्यांच्याकडे दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य लोखंडी कटावणी, कटर, कुर्हाड, लाकडी दांडे, लोखंडी रॉड, दोरी, मिरची पावडर पुडी आणि मालवाहू टेम्पो (क्र. एमएच.17, सीव्ही.1084) असे मिळून आले. पोलिसांनी नऊ जणांपैकी तिघांना ताब्यात (Arrested) घेतले तर उर्वरित सहा जणांना निष्पन्न करण्यात यश आले आहे.
याप्रकरणी सहायक फौजदार बाबासाहेब पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आकाश सुनील पाळंदे, रोहित भिरु मुळेकर (दोघे रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता), सिद्धू मकवाने (पूर्ण नाव माहीत नाही रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता), कादिर (पूर्ण नाव माहीत नाही रा. घुलेवाडी, संगमनेर), शरद उर्फ गोट्या हरिभाऊ पर्बत (रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर), एक अल्पवयीन व तिघे अज्ञात यांच्यावर गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे हे करत आहे. दरम्यान, या दरोडेखोरांकडून ग्रामीण भागातील अनेक चोर्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.