अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या 25 जागांसाठी 210 उमेदवारांनी येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लेखी परीक्षा दिली. 212 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मात्र दोन उमेदवार परीक्षेसाठी गैरहजर राहिले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सकाळी 7:45 ते 9:15 वाजेच्या दरम्यान परीक्षा घेण्यात आली. जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या 25 पोलीस शिपाई व 39 चालक शिपाई अशा 64 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 19 ते 27 जून या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली.
पोलीस शिपाई पदाच्या 25 जागा असून त्यासाठी एकूण 879 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली होती. त्यापैकी 441 उमेदवारांना 25 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत. सदर उमेदवारांमधून एकास दहा या प्रमाणात प्रवर्गनिहाय एकूण 212 एवढेच उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते.
पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी रविवारी पहाटे पाच वाजता येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर बोलविण्यात आले होते. त्यापैकी 210 उमेदवारांनी हजेरी लावली. त्यांची पोलीस पथकामार्फत तपासणी करून त्यांना प्रवेश देण्यात आला. 100 गुण व 90 मिनिटांची ही परिक्षा होती. सकाळी 7:45 ते 9:15 वाजेच्या दरम्यान परीक्षा घेण्यात आली. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार आदी उपस्थित होते.