नाशिक |
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत त्याच्या कुटुंबीयांवरही कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला पोलिसांनी त्याच्या नाशिकमधील घरातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या मुळे आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिर्डी येथे जमीन खरेदी प्रकरणात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सकाळीच दोन आरोपींना अटक केली होती. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरातचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
दरम्यान, बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांमुळे आधीच अटकेत असलेल्या अशोक खरातविरोधात नवनवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यामुळे हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले असून राज्यभरात खळबळ उडाली आहे.
हर्षवर्धन खरातच्या ताब्यातून या संपूर्ण प्रकरणातील आर्थिक व्यवहार, जमीन खरेदीतील अनियमितता आणि इतर संबंधित बाबींबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. पोलिस तपास वेगाने सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





