Tuesday, September 29, 2026
HomeनगरPathardi : प्रभारी पोलीस निरीक्षकाकडून मढीत धूडगूस

Pathardi : प्रभारी पोलीस निरीक्षकाकडून मढीत धूडगूस

वाहनांच्या काचा फोडल्या || शिवीगाळ व मारहाण, नाथभक्तांमध्ये संताप

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

मढी यात्रेदरम्यान पाथर्डी येथे वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी काही वाहनांच्या काचा फोडल्याचा आणि वाहनांना काठ्यांनी मारून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकरणी एका नागरिकाने उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे नाथभक्तांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

- Advertisement -

या संदर्भात निलेश बाबुराव शिंदे (वय 42, व्यवसाय- मेकॅनिकल इंजिनिअर, रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे, 8 मार्च 2026 रोजी सकाळी ते आपल्या आई पद्मा शिंदे यांच्यासह तिसगाव येथील अशोक मंगल कार्यालयात नातेवाईकांच्या लग्नासाठी आपल्या एमएच 20 एचएन 0008 क्रमांकाच्या फॉर्च्युनर कारने जात होते. दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास तिसगाव-पाथर्डी रोडवर अशोक लॉन्स परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना कुठे जायचे आहे, अशी विचारणा केली. त्यांनी लग्नसमारंभासाठी मंगल कार्यालयात जात असल्याचे सांगितल्यावर पुढे जाण्यास सांगण्यात आले, असे शिंदे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

दरम्यान, पुढे जात असताना पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे समोरील काही वाहनांच्या काचा फोडत असल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी शिंदे यांच्या वाहनाची काच फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र काच खाली असल्याने ती फुटली नाही. त्यानंतर पुजारी यांनी काठीने वाहनाच्या उजव्या बाजूच्या दरवाजावर मारून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत विचारणा केल्यावर पुजारी यांनी शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळी शिंदे यांच्या आई पद्मा शिंदे या वाहनातून खाली उतरल्या असता त्यांनाही शिवीगाळ करून काठीने पायावर मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी आपल्या लेखी तक्रारीतून उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव यांच्याकडे केली आहे. दरम्यान, मढी यात्रेदरम्यान घडलेल्या या प्रकाराचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने नाथभक्त आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून चौकशी होऊन नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...