नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) मतदारसंघासाठी येत्या सोमवारी (दि.२० मे) रोजी मतदान (Voting) प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेदरम्यान, कायदा व सुव्यवस्थेला व लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी जवळपास सर्वच सराईत हिस्ट्रीशिटर व काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना परिमंडळ एक अणि दोनच्या पोलीस उपायुक्तांनी तडीपारीच्या नोटीसा बजावल्या आहेत. यात बहुतांश संशयितांना येत्या मंगळवारपर्यंत तात्पुरते तडीपार करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील तेराही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईतांची यादी अपडेट करण्यात आली आहे. यात शरीर व मालाविरुद्ध विविध गंभीर गुन्हे करुन दहशत माजविणाऱ्यांचा समावेश आहे. हेच संशयित सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकारी व नेत्यांच्या जवळचे आहेत. तसेच काही राजकीय पदाधिकारी देखिल या निवडणुकीत काही कारणास्तव मतदान केंद्र, मोकळे मैदान व विविध भागांत गोंधळ घालण्याची शक्यता आहे. त्यातून मतदान प्रक्रियेवर विपरित परिणाम होऊ शकतो, हे विचारात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा दणका म्हणूण ही कार्यवाही केली आहे.
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत यांनी तेराही पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक आणि चारही विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांकडून आलेल्या तडीपारी प्रस्तावांवर कार्यवाही करुन संबंधित संशयितांना पोलीस ठाण्यांमार्फत तडीपारीच्या नोटीसा दिल्या आहेत. तर, विशेष म्हणजे शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी तडीपारीच्या नोटिसा बजाविल्याचे समजते. दरम्यान, ज्या सराईतांना व पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, त्यांना मतदान प्रक्रिया संपेपर्यंत म्हणजेच पुढील तीन दिवस शहरासह जिल्ह्यातून तडीपार केल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
पूर्वपरवानगी शिवाय आल्यास कठोर कारवाई
तडिपार केले असतानाही, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस ठाणे, गुन्हेशाखांची पथके बारीक नजर ठेऊन असणार आहेत. तडिपार कालावधीत कुणीही नाशिक शहर व जिल्ह्यात आढळल्यास संबंधितांवर तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याची स्वतंत्र कारवाई केली जाणार आहे.